उस्मानाबाद : तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव वेळोवेळी पाठविण्यात आले होते. मात्र, पुरातत्त्व खात्याने ते नाकारल्याने मोठी नामुष्की ओढावली होती. दरम्यान, आता पुरातत्त्व खात्याने त्यांच्या सूचीतील वास्तुविशारदाकडून प्लॅन बनवून घेण्याची सूचना केली आहे. त्यामुळे लवकरच असा प्लॅन तयार होऊन कामांचा मार्ग मोकळा होणार आहे.
तुळजाभवानी मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही कामाला पुरातत्त्व खात्याच्या मंजुरीशिवाय कसलीही विकासकामे संस्थेला करता येत नाहीत. येथील प्राचीन वास्तूच्या बांधकामास कसलीही बाधा न पोहोचता नवीन कामे करावी लागतात. दरम्यान, प्राधिकरणाकडून यापूर्वी जवळपास २० कोटींच्या स्कायवॉकचा ठराव घेऊन तो मंजुरीसाठी पुरातत्त्वकडे पाठविण्यात आला होता. याशिवाय, इतरही कोट्यवधींच्या कामांचे प्रस्ताव होते. मात्र, ते नाकारण्यात आले. संबंधित कामे करताना ती पुरातत्त्व विभागाच्या सूचीतील वास्तुविशारदाकडून प्लॅन घेणे आवश्यक आहे. मात्र, तसे न झाल्याने हे प्रस्ताव नाकारले जात होते.
दरम्यान, मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी पुरातत्त्व विभागाकडे पत्रव्यवहार केल्यानंतर ही बाब लक्षात आणून देण्यात आली. आता पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी मंदिर संस्थानला वास्तुविशारदाकडून साइट मॅनेजमेंट प्लॅन बनवून घेण्याची सूचना केली आहे. हा प्लॅन तयार झाल्यानंतर लागलीच कामांची प्रक्रिया सुरू करता येणार आहे.
जेजुरीच्या धर्तीवर मॅनेजमेंट प्लॅन...जेजुरी देवस्थानने मंदिर परिसर विकासाच्या दृष्टिकोनातून पुरातत्त्व विभागाच्या सूचीतील वास्तुविशारदाकडून १०९ कोटींचा आराखडा बनवून घेतला आहे. तो शासनासही सादर करण्यात आला आहे. याच धर्तीवर आता तुळजापूर मंदिर संस्थानकडून असा साइट मॅनेजमेंट प्लॅन लवकरच तयार करून घेतला जाणार आहे. तो तयार झाल्यानंतर विकासकामांचा मार्ग मोकळा होईल.- कौस्तुभ दिवेगावकर, अध्यक्ष, तुळजाभवानी मंदिर संस्थान