धाराशिव : धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सोमवारी बिनविरोध पार पडली. यावेळी सर्वानुमते सभापती म्हणून राजेंद्र बाळासाहेब पाटील यांची, तर उपसभापती म्हणून शेषेराव हिरामन चव्हाण यांची निवड करण्यात आली.
धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीची २८ एप्रिल रोजी मतदान होऊन लगेच दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २९ एप्रिल रोजी मतमोजणी झाली. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना शिंदे शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १७ जागांवर विजय मिळवत बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. २२ मे रोजी या बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडीसाठी पीठासीन अधिकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था धनंजय काळे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालकांची विशेष सभा बोलावण्यात आली होती. यावेळी सभापती पदासाठी सांजा येथील राजेंद्र बाळासाहेब पाटील व उपसभापती पदासाठी जहागीरदारवाडी येथील शेषेराव हिरामन चव्हाण यांचा प्रत्येकी एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
उद्या होणार तीन बाजार समितीच्या निवडीसोमवारी कळंब व धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडी झाल्या आहेत. मंगळवारी उरमगा, भूम, वाशी या तीन कृषी उत्पन्न बाजार समितींच्या सभापती, उपसभापती पदांच्या निवडी केल्या जाणार आहेत.