धाराशिव -मराठा आरक्षणाचे नेते मनाेज जरांगे पाटील यांनी ‘चलाे मुंबई’ची हाक दिली आहे. त्यानुषंगाने शहरांसाेबतच गावाेगावी बैठकांच्या माध्यमातून तयारी सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून मंगळवारी धाराशिव ते तुळजापूर अशी महावाहन रॅली काढण्यात येणार आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने साेमवारी ही घाेषणा केली.
मराठा आरक्षणाचे नेते मनाेज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात हक्कासाठी संघर्ष सुरू आहे. २० जानेवारी राेजी मुंबईच्या दिशेने कूच करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यानुषंगाने मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील गावागावांत बैठका घेऊन तयारी करण्यात येत आहे. मुंबईला जाण्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून मंगळवारी धाराशिव ते तुळजापूर अशी महारॅली काढण्यात येणार आहे.
ही रॅली शहरातील छत्रपती शाहु महाराज चाैक (तेरणा काॅलेज) येथून सुरू हाेईल. नंतर महात्मा बसवेश्वर चाैक, राजमाता जिजाऊ चाैक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैक, छत्रपती शिवाजी महाराज चाैक, देशपांडे स्टॅन्ड, राजमाता अहिल्यादेवी हाेळकर चाैक मार्गे तुळजापूर शहरात दाखल हाेईल. श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावे, मुंबई येथील मनाेज जरांगे पाटील यांच्यासह सर्व समाजबांधवाचे आंदाेलन यशस्वी व्हावे, यासाठी साकडे घातले जाणार आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली.