काक्रंबा : केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री खरीप पीक विमा भरण्यासाठी विमा कंपनीने सुरू केलेले पोर्टल सोमवारी दुपारपासून संथ गतीने चालत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी अडचण निर्माण होत असून, बऱ्याच शेतकऱ्यांना पिकांचा विमा संरक्षित करण्यापासून वंचित राहावे लागणार असल्याचे दिसत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दीड वर्षे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. त्यातच गेल्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उभ्या पिकासह जमिनी वाहून गेल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीस आला. राज्य सरकारने तुटपुंजी मदत करत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांचे नुकसान पाहण्यासाठी दौरे ही झाले. पंचनाम्याचे आदेश दिले. पंचनामे ही झाले. जवळपास ३५ टक्केपेक्षा अधिक नुकसान शासनदरबारी नोंदले गेले. त्यामुळे आता पीक विमा मिळणार या आशेवर शेतकरी होता. मात्र, विमा कंपनीने ज्या शेतकऱ्यांनी ७२ तासाच्या आत विमा कंपनीत नुकसानीची माहिती दिली त्याच शेतकऱ्यांना विमा मिळेल, अशी अट घातल्याने अनेकांना नुकसान होऊनही पीक विमा मिळाला नाही.
मागील वर्षीचा अनुभव पाहून यंदा शेतकरी विमा भरण्यासाठी धजावत नव्हता. मात्र, गेल्या चार दिवसापासून कागदपत्र काढून पैसे घेऊन ग्रामीण भागातील सीएससी सेंटरवर विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होताना दिसत आहे. दरम्यान, सोमवारपासून पोर्टल संथ गतीने चालत असून, बुधवार सायंकाळपर्यंत अशीच परिस्थिती होती. १५ जुलै ही विमा भरण्याची अंतिम मुदत असून, अद्याप बहुतांश शेतकऱ्यांचा विमा भरणे बाकी आहे. अशातच पोर्टलची समस्या असल्याने शेतकरी काळजीत पडला आहे.