तुळजापूर : राज्य आरोग्य विभाग संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी बुधवारी उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन उपचार व सुविधांचा आढावा घेतला. तसेच नगर परिषदेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचीही माहिती घेतली.
यावेळी डॉ. पाटील यांनी रुग्णालयात डॉक्टर, कर्मचारी व सेवक वर्ग पुरेसा आहे का, याची चौकशी करून प्रयोगशाळा व तेथील उपक्रमाबद्दल तांत्रिक माहिती घेतली. वैद्यकीय अधीक्षिका डॉ. चंचला बोडके व डॉ. श्रीधर जाधव यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डी. के. पाटील, डॉ. दिग्विजय कुतवळ, डॉ. वडगावे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
यानंतर शहरातील कोरोना कोविड परिस्थितीचा आढावा नगर परिषद मुख्याधिकारी अशिष लोकरे यांच्याकडून घेतला. कोरोना कक्षास भेट देऊन तेथील रुग्णांचीही त्यांनी विचारपूस केली.
यावेळी जिल्हा वैद्यकीय अधिकारी हनुमंत वडगावे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंचला बोडके, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर जाधव तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास पवार व नगरपरिषद कार्यालय अधीक्षक वैभव पाठक उपस्थित होते.
या दौऱ्यात शहरातील विश्वास नगर येथील एका गृहविलगीकरण कक्षातील कुटुंबास भेट देऊन त्यांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा व उपचारांची डॉ. पाटील यांनी माहिती घेतली.