उस्मानाबाद : येथील नगर परिषदेतील शिवसेनेचे उपनगराध्यक्ष सुरज साळुंके यांच्याविरूद्ध राष्ट्रवादी, भाजपाच्या जवळपास २५ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यामुळे शनिवारी विशेष सभा बोलावण्यात आली असता, २८ विरूद्ध ०३ अशा बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला. विशेष म्हणजे, शिवसेनेला स्वत:च्या नगरसेवकांचे मतदानही शाबूत ठेवता आले नाही. चार नगरसेवकांनी ठरावाच्या बाजुने मतदान केले. तसेच सेना गटनेत्यासह पाच सदस्यांनी सभागृहाकडे न फिरकणे पसंत केले. दरम्यान, भाजपाने स्वतंत्र व्हीप काढूनही गटनेत्या असलेल्या ज्योती साळुंके व राष्ट्रवादीच्या अनिता पवार याही सभेला गैरहजर राहिल्या. अन्यथा ठरावाच्या बाजुने किमान ३० एवढे मतदान झाले असते.
उस्मानाबाद नगर परिषद सभागृहात राष्ट्रवादीच्या मदतीने उपनगराध्यक्ष पदी विराजमान झालेले सुरज साळुंके यांच्या विरोधात राष्ट्रवादी आणि भाजपाचे मिळून २५ जणांनी १३ डिसेंबर रोजी अविश्वास ठराव दाखल केला होता. यानंतर नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी विशेष सभा बोलावली होती. सभेपूर्वी दोन दिवस अगोदर म्हणजेच गुरूवारीच शिवसेनेचे गटनेते सोमनाथ गुरव यांनी व्हीप काढून सर्व सदस्यांना ठरावाच्या विरोधात मतदान करण्याचे आदेश दिले होते. परंतु, शुक्रवारी या परिस्थितीत ‘व्टिस्ट’ निर्माण झाले. शिवसेनेच्या गटनेत्या आपणच आहोत, असे सांगत प्रेमाताई पाटील यांनी सेनेच्या अकरा नगरसेवकांच्या नवाने व्हीप काढला व अविश्वास ठरावाच्या बाजुने मतदान करण्याचे आदेश दिले. हे पत्र प्रसारमाध्यमांकडे पोहोचताच सेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांनी पत्र काढून ‘सोमनाथ गुरव हेच गटनेते आहेत. त्यांचाच व्हीप अधिकृत असेल. तसेच प्रेमा पाटील यांच्यावर गुन्हा नोंदवावा’, अशा स्वरूपाचे पत्र काढले. आणि ते जिल्हाधिकाऱ्यांनाही दिले. या दोन स्वतंत्र व्हीपमुळे सेनेमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे कोणाचा व्हीप ग्राह्य धरणार?, नगरसेवक कोणाचा व्हीप पाळणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे विशेष सभेत काय होते? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते.
दरम्यान, शनिवारी सकाळी ११ वाजता नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांच्या दालनात विशेष सभा ठेवण्यात आली. सभेला सुरूवात झाल्यानंतर सभागृहातील सदस्य गणना करण्यात आली. यानंतर ठरावाच्या बाजुने असलेल्या सदस्यांना हात उंचावण्यास सांगण्यात आले असता, सेनेत फुट पडल्याचे स्पष्ट झाले. सेना नकरसेवक प्रेमाताई पाटील, अनिता निंबाळकर, राणा बनसोडे आणि सोनाली वाघमारे यांनी सुरज साळुंके यांच्या विरोधात म्हणजेच ठरावाच्या बाजुने मतदान केले. राष्ट्रवादीचे सोळा, भाजपाचे सात, अपक्ष एक आणि सेनेचे चार असे एकूण २८ मतदान ठरावाच्या बाजुने झाले. यानंतर ठरावाच्या विरोधात मतदान घेण्यात आले. यावेळी साळुंके यांना नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, राजाभाऊ पवार आणि स्वत: साळुंके यांनी हात उंचावून मतदान केले. ठराव पारित होण्यासाठी २७ मतदान बाजुने असणे बंधनकारक होते. शिवसेनेचे चार नगरसेवक मदतीला धावून गेल्याने राष्ट्रवादी, भाजपाला मॅजिक फिगर सहजरित्या गाठता आली. त्यामुळे नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी सुरज साळुंके यांच्याविरूद्धचा अविश्वास ठराव २८ विरूद्ध ३ अशा फरकाने मंजूर झाल्याचे जाहीर केले. परिणामी सेनेचे सुरज साळुंके यांना उपनगराध्यक्ष पदावरून पायउतार व्हावे लागले.