लोहारा : लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेला सन २०१६ ते २०२१ पर्यंतचे ऑडिट रिपोर्ट दाखल करून वेतनेतर अनुदान उचल्याच्या तक्रारीवरून तत्काळ खुलासा सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी दिले आहे.
जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) गजानन सुसर यांच्याकडे ८ फेब्रुवारी रोजी भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिनकरराव जावळे-पाटील यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. यानुसार, लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका ऊर्मिला पाटील व सचिव या दोघांनी कसलेही अधिकार नसताना वार्षिक वेतनवाढी घेणे तसेच ऑडिट रिपोर्ट दाखल करून वेतनेतर अनुदान उचललेले आहे. त्यामुळे मुख्याध्यापिका व सचिव या दोघांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच सन २००६ ते २०२१ पर्यंत ऑडिट रिपोर्ट व वेतनेतर अनुदान किती दिले तसेच बँक स्टेटमेंटची माहिती मिळण्याची विनंती त्यांनी केली होती. यावरून शिक्षणाधिकारी गजानन सुसर यांनी १२ मार्च रोजी तत्काळ खुलासा सादर करण्याचे आदेश मुख्याध्यापिका ऊर्मिला पाटील यांना दिले आहेत.