पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथील ३३ के. व्ही. उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त असून, खंडित वीज पुरवठ्याचा गावच्या पाणी पुरवठ्यावर देखील परिणाम होत आहे. त्यामुळे पारगावसाठी स्वतंत्र फिडरची मागणी होत आहे.
वाशी तालुक्यातील पारगाव येथील ३३ के. व्ही. उपकेंद्रातून पारगावसह, हातोला, जेबा, जनकापूर, रुई, पांगरी, लोणखस, ब्रह्मगाव, पिंपळगाव (क) या गावांना वीज पुरवठा होतो. सदरील नऊ गावांचा शिवार मोठा असल्याने सातत्याने काही न काही बिघाड सुरूच असतात. शिवाय पावसाळ्यात तर मोठ्या प्रमाणात बिघाड होतात. लोणखस किंवा रूई फिडरवरील बिघाड दुरुस्त करायचा असला तरी पारगावचा वीज पुरवठा खंडित केला जातो. सततच्या होणाऱ्या बिघाडामुळे व वीज पुरवठा खंडित होण्यामुळे पारगाव येथील वीज ग्राहक पुरते वैतागले आहेत. शिवाय खंडित वीज पुरवठ्यामुळे ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो आहे.
दरम्यान, खंडित विजेबाबत उपकेंद्रात संपर्क साधल्यानंतर कुठल्यातरी गावात काम सुरू असून, त्याचे परमिट घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळे उपकेंद्रांतर्गत असलेल्या गावांची लोकसंख्या लक्षात घेऊन पारगावसाठी स्वतंत्र फिडर बसवून अखंडित वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.