कळंब : कळंब व वाशी तालुक्यातील पारधी समाजातील कुटूंबाची शिबिरे घेऊन त्यांना जातीचे प्रमाणपत्र, कुटूंब विभक्त करून रेशनकार्ड, वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी लाल पँथर संघटनेने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कळंब व वाशी तालुक्यातील बहुतांश गावात पारधी समाज मोठ्या प्रमाणात आहेत. या समाजाची परिस्थिती चांगली व्हावी यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. परंतु, बहुतांश पारधी समाजातील कुटूंबाकडे जात प्रमाणपत्र, रेशनकार्ड उपलब्ध नाहीत. यासंदर्भात लाल पँथर संघटनेचे अध्यक्ष बजरंग ताटे यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. यात एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांना बोलावून पारधी समाजाच्या योजना व पारधी समाजाच्या कुटूंबाला व युवकांना मार्गदर्शन करावे, पारधी कुटूंबात तीन-तीन पिढ्यांपासून शिधापत्रिका एकाच कुटूंबात असलेल्या अनेक कुटूंबे आहेत. त्यांना विभक्त करून स्वतंत्र प्रत्येक कुटूंबाला पिवळे रेशनकार्ड देण्यात यावे, प्रत्येक व्यक्तीला जातीचे प्रमाणपत्र द्यावे, मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण, गरोदर महिलांना लसीकरण, गरोदर महिलांना सकस आहार द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बजरंग ताटे, जिल्हाध्यक्षा माया शिंदे, संगिता बिकड, नवनाथ भंडारे, सुनील गायकवाड, आदिनाथ मोरे, खुदोद्दीन मुजावर, सोपान जाधव यांच्या सह्या आहेत.