गोरे, साठे, करंदीकर यांचा सन्मान
उस्मानाबाद : माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधत येथील लोकसेवा समितीच्या वतीने लोकसेवा पुरस्कार २०२० चे वितरण करण्यात आले. समितीचे अध्यक्ष ॲड. मिलिंद पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला.
समाजातील निस्पृह समाजसेवा करणाऱ्या सेवानिवृत्त सेवावृत्तींचा सन्मान करण्याच्या हेतूने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यावेळी समितीचे उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, सचिव कमलाकर पाटील, विद्याभारती पश्चिम क्षेात्राचे मंत्री शेषाद्री डांगे व्यासपीठावर उपस्थित होते.
या सोहळ्यात उस्मानाबाद नगर परिषदेचे कर्मचारी विलास सावळाराम गोरे यांना कोरोना काळात मरण पावलेल्या जवळपास साडेतीनशे रुग्णांचा अंत्यविधी करून मानवतेचा आदर्श समाजासमोर ठेवल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराचे हे दुसरे मानकरी सौदागर निवृत्ती साठे ठरले. लोहारा ग्रामीण रुग्णालयातील १०८ रुग्णवाहिकेचे चालक म्हणून काम करीत असताना कोविड काळात तत्पर रुग्णसेवा केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. औरंगाबाद येथील मालती मनोहर करंदीकर यांना सेवानिवृत्तीनंतर डॉक्टर हेडगेवार रुग्णालयात तसेच इतर संस्थांच्या माध्यमातून निरपेक्षपणे सेवा दिल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. प्रशांत चौधरी यांनी केले. संस्थेचे सचिव कमलाकर पाटील यांनी प्रास्ताविक केले तर डॉ मनिष देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास शहरातील निमंत्रित तसेच आर्य चाणक्य विद्यालय, समर्थ आश्रम शाळा, व्यंकटेश महाजन महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
उस्मानाबाद येथे लोकसेवा समितीच्यावतीने नगराध्यक्ष नंदू राजे निंबाळकर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना मालती मनोहर करंदीकर. समवेत ॲड. मिलिंद पाटील, कमलाकर पाटील, शेषाद्री डांगे, डॉ. अभय शहापूरकर, सुषमा पाटील आदी. (छाया/कालिदास म्हेत्रे)