उस्मानाबाद : पावसाअभावी उसासह सोयाबीन पिकास पाण्याची कमतरता भासू लागली आहे. पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यास आधार मिळावा यासाठी सारोळा (बु.) येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांच्या हस्ते शेतकऱ्यास पाणबुडी मोटारीसह साहित्याचे शुक्रवारी वितरण करण्यात आले.
सारोळा येथील शेतकरी चंद्रकांत मसे यांनी उसाची लागवड केलेली आहे. मात्र, गत अनेक दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. नदीपात्रात पाणी असतानाही केवळ पाणबुडी मोटार नसल्याने उसास पाणी देता येत नव्हते. जिल्हा परिषदकडे पाणबुडी मोटार मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे. मात्र, अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी मसे यांनी सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांच्याकडे 'काहीही करा, पण पाणबुडी मोटार द्या,' अशी मागणी केली. याची बाकले यांनी तत्काळ दखल घेऊन उस्मानाबाद येथील विनायक मगर यांच्या प्रशांत मशिनरी दुकानात शेतकरी मसे यांना बोलावले, तसेच तीन एच.पी. क्षमतेची पाणबुडी मोटार, पॅनल बॉक्स, किटकॅट, स्टार्टरसह ॲटो स्विच हे साहित्य त्यांच्याकडे सुपूर्द केले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जास्तीत-जास्त योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही बाकले यांनी दिली.