उस्मानाबाद : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र भयावह परिस्थिती व वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रभाग १५ मधील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे घर व परिसरात सॅनिटायझर केले जात आहे. तसेच शिवसेनेचे नगरसेवक सूरज साळुंके यांनी कोरोना रुग्णांच्या कुटुंबांस वाफ घेण्याचे यंत्र (मशीन) वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे.
एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला असेल तर त्याने व त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये. परंतु, त्यांनी अत्यावश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी. प्रत्येकाने घराबाहेर पडताना तोंडाला मास्क बांधणे, हात सतत धुणे, सॅनिटायझर करणे, गर्दीमध्ये न मिसळणे व गर्दी जमा होणार नाही, यासाठी प्रबोधन करणे व दोन व्यक्तींमधील सुरक्षित अंतर राखणे यास प्राधान्य देणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे साळुंके यावेळी म्हणाले. माळी गल्ली, देवकते गल्ली, मल्हारनगर, इंगळे गल्ली, महाजन गल्ली, फराश गल्ली, मोहिते गल्ली, डांगे गल्ली, जोशी गल्ली, कसबा-राम मंदिर परिसर व तालीम चौक आदी भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेल्या कुटुंबांना हे मास्क वाटप करण्यात येत आहेत. दरम्यान, कोरोना कालावधीत एखाद्या गरीब व गरजू कुटुंबाला जीवनावश्यक साहित्याची गरज असल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. मी या प्रभागातील एकाही व्यक्तीची उपासमार होऊ देणार नाही. त्यांना आवश्यक असलेले जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून देऊ, असेही नगरसेवक सूरज साळुंखे यांनी सांगितले.