उस्मानाबाद : तुळजापूर पालिकेच्या नगराध्यक्षा अर्चना गंगणे या दीर्घकाळ गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी अपात्रतेची कारवाई केली आहे़ यात्रा अनुदान अपहार व घरकुल अपहारात गंगणे या आरोपी आहेत़ याच प्रकरणात त्या दीर्घकाळ फरार होत्या़
तुळजापूर नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा अर्चना विनोद गंगणे या त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमुळे दीर्घकाळ पालिकेत गैरहजर असल्याची तक्रार येथील सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांनी १६ जून २०१७ रोजी केली होती़ या गुन्ह्यांमध्ये काही नगरसेवक व अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही गुन्हे दाखल असल्याने पालिकाच बरखास्त करुन त्यावर प्रशासक नेमण्याची मागणी माने यांनी तक्रारीत केली होती़ या तक्रारीनुसार जिल्हाधिकारी डॉ़राधाकृष्ण गमे यांनी हे प्रकरण ४ सप्टेंबर २०१७ रोजी सुनावणीसाठी घेतले़ दरम्यानच्या काळात सुनावणीच्या बारा तारखा झाल्या.
अर्जदाराचा युक्तीवाद, प्रकरणातील साक्षीदारांच्या साक्षी व समोर आलेले पुरावे ग्राह्य धरुन जिल्हाधिकारी गमे यांनी गुरुवारी नगराध्यक्षा अर्चना गंगणे यांना महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ५६(३) नुसार अपात्रतेची कार्यवाही केली़ समोर आलेल्या साक्षी तसेच कागदपत्रांच्या पुराव्यात नगराध्यक्षा या १९ मार्च २०१७ ते १२ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत गैरहजर राहिल्याचा ठपका जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात ठेवला आहे़ या आदेशामुळे गुरुवारपासूनच तुळजापूर पालिकेचे अध्यक्षपद रिक्त झाले आहे़
साक्षीदारांवरही ताशेरेया प्रकरणात नगराध्यक्षा अर्चना गंगणे या पालिकेत हजर असल्याचे सांगणाऱ्या साक्षीदारांवरही जिल्हाधिकाऱ्यांनी ताशेरे ओढले आहेत़ अजामीनपात्र गुन्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ४३ नुसार सामान्य व्यक्तीसही आरोपीला अटक करता येऊ शकते किंवा तशी माहिती पोलिसांना देणे आवश्यक असते़ मात्र, गंगणे यांच्यावर असे गुन्हे दाखल असतानाही संबंधित साक्षीदारांनी या कलमाचे अनुपालन न केल्याबद्दल ताशेरे ओढण्यात आले.
काय आहे प्रकरण?तुळजापुरात राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेत २ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी नगराध्यक्षा अर्चना गंगणे यांच्यासह तत्कालीन अधिकाऱ्यांवरही १९ मार्च २०१७ रोजी गुन्हा दाखल झाला होता़ तसेच तुळजाभवानी मातेच्या नवरात्रौत्सवासाठी राज्य शासनाकडून मिळालेल्या यात्रा अनुदानात १ कोटी ६२ लाख रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा नगराध्यक्षा अर्चना गंगणे, तत्कालीन मुख्याधिकारी संतोष टेंगळे, लेखापाल अविनाश राऊत यांच्यासह नगरसेवक, ठेकेदार अशा १९ जणांवर २८ मार्च २०१७ रोजी दाखल आहे़