तुळजापूर (जि. धाराशिव) : श्री तुळजा भवानी देवीच्या भाविकांनी वाहिलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मोजणी नुकतीच पूर्ण झाली आहे. त्याचा अंतिम अहवाल समितीने सादर केल्यानंतर यातील गहाळ दागिन्यांच्या प्रकरणात जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी तहसीलदारांना दिले आहेत.
तुळजा भवानी देवीला श्रद्धेने वाहिलेल्या दागिन्यांची एका समितीच्या माध्यमातून मोजणी करण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाकडे असलेल्या दागिने-वस्तूंच्या नोंदीनुसार त्या प्रत्यक्षात खजिन्यात आहेत का, त्यांचे वजन नोंदीनुसार आहे का, याचेही संकलन या समितीने केले. दरम्यान, मोजणीच्या वेळी नोंदवहीतील नोंद असलेले काही दागिने, वस्तू, नाणी प्रत्यक्षात उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. समितीने आपला मोजणी अहवाल दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गहाळ असलेल्या दागिने, वस्तू प्रकरणात जबाबादारी निश्चित करण्याबाबत समितीला सूचित केले होते. त्यानुसार काही महंत, तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक, तत्कालीन प्रशासक, सेवेकरी व काही कर्मचाऱ्यांची जबाबदारी यामध्ये निश्चित करण्यात आली आहे. तसेच या गहाळ दागिन्यांची जबाबदारी तत्कालीन धार्मिक व्यवस्थापकांची असल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंगळवारी याबाबत मंदिराचे व्यवस्थापक तथा तहसीलदार सोमनाथ माळी यांना याबाबतचे पत्र दिले आहे.
दरम्यान, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी दागिन्यांची मोजणी करून वस्तुस्थिती बाहेर आणल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तर पाळीकर पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी आता या प्रकरणात दोषी असणाऱ्या सर्वांवर तातडीने गुन्हा दाखल व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
हा दुसरा गुन्हा ठरणारसमितीने दागिन्यांची मोजणी करून दिलेल्या अहवालात ज्या वस्तू, दागिने गहाळ असल्याचे म्हटले आहे, त्यापैकी काही वस्तू, नाणी व दागिन्यांच्या प्रकरणात यापूर्वीच गुन्हा नोंद झालेला आहे. त्या बाबी वगळता, नव्याने ज्या गहाळ झाल्या आहेत, त्याविषयी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्याचे मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले.