चेतन धनुरे / उस्मानाबाद : येथील जिल्हा रुग्णालयासाठी मंजूर करण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लॅटचे काम मुदत संपूनही पूर्ण होताना दिसत नाही. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासन पुन्हा तयारीला लागले असताना मूळ वैद्यकीय तयारीच अपूर्ण दिसते.
उस्मानाबाद जिल्ह्याने कोरोनाबाधितांच्या संख्येच्या बाबतीत १७ हजारांचा उंबरठा ओलांडला आहे. ५७४ जणांना मृत्यूने गाठले आहे. या मृत्यूमध्ये अपुऱ्या ऑक्सिजन यंत्रणेचा मोठा वाटा आहे. दरम्यान, दिवाळीनंतर बाधितांची संख्या कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेने सुस्कारा सोडला. मात्र, एकदा ठेच खाल्ल्यानंतरही आप शहाणपण आलेले दिसत नाही. राज्याच्या तुलनेत उस्मानाबादचा मृत्युदर खूप पुढे आहे. अशा स्थितीत तरी ऑक्सिजन प्लँटचे काम जबाबदारीने वेळेत पूर्ण करून घेणे आवश्यक होते. मात्र, कामाची मुदत संपून आता महिना होत आला आहे तरीही हा प्लँट अपूर्णावस्थेत आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढीस लागल्याने पुन्हा एकदा मुकाबल्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. अशावेळी शक्य तितक्या लवकर ऑक्सिजन प्लँट कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे.
आधीच झाला उशीर...
सुरुवातीला या प्लँटची किंमत सुमारे ८० लाख रुपये निश्चित करण्यात आली होती. त्यातही पुन्हा कामावरून अंतर्गत धुसफूस झाल्याने काम रखडले होते. दरम्यान, अवास्तव वाढविण्यात आलेली किंमत नंतरच्या काळात कमी करून ती ५५ लाखांवर आणत लागलीच निविदा काढण्यात आल्या. नाशिकच्या एका कंपनीस हे काम मिळाले. नोव्हेंबरअखेरीस कार्यारंभ आदेश देऊन २ महिन्यांची मुदत ठेकेदारास देण्यात आली होती. अर्थात जानेवारी अखेरीस हा प्लँट पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, आता फेब्रुवारीही संपत आला तरी काम पूर्ण झालेले नाही.
घोडे अडले कुठे..?
यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ठेकेदारास काम वेळेत पूर्ण न केल्याने नियमांनुसार दंड सुरू केल्याचे सांगितले शिवाय, ठेकेदाराकडे विचारणा केली असता त्याच्याकडून ऑक्सिजन टँकसाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या वेळेत न मिळाल्याने हा विलंब झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा टँक दिल्लीच्या नोएडा भागातून आणावा लागतो. त्यामुळे वेळ जात असल्याचे ठेकेदाराचे म्हणणे असल्याचे डॉ. पाटील म्हणाले.
ऑक्सिजनवर कोटीचा खर्च...
कोरोनाच्या पीक पिरियडमध्ये अर्थात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत ८४ हजार ४३७ किलोलीटर ऑक्सिजनचा वापर करण्यात आला. यासाठी सुमारे १ कोटी १२ लाख १७ हजार ३०० रुपये खर्च झाले. स्वत:चा प्लँट नसल्याने रुग्णालयास बाहेरून विकत ऑक्सिजन घ्यावे लागले. आता मंजुरी मिळून पैसे पडलेले असतानाही काम पूर्ण होण्यास विलंब केला जात आहे.