लोहारा : जनुकीय बदल केलेल्या सोया केकचा आयातीस परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर व वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे राष्ट्रवादी युवकचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल जगताप यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केली आहे.
केंद्र शासनाने नुकतेच जनुकीय बदल केलेल्या सोया केकच्या बारा लाख टन आयातीस परवानगी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय महाराष्ट्रसह भारतातील करोडो शेतकऱ्यांवरती अन्याय करणारा आहे. कारण जनुकीय बदल असलेले सोय केकचे पीक घेण्यास भारतात परवानगी नाही. मात्र, परदेशातून थोडेथोडके नव्हे, तर बारा लाख टन सोया केक आयातीस परवानगी दिलेली आहे. त्यात प्रतिकूल हवामान घटकांमुळे उत्पादनात घट झाल्याने कळंब तालुक्यातील निपाणी, तसेच लाेहारा तालुक्यातील काटे चिंचाेली येथील प्रत्येकी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. सरकारच्या अशा निर्णयामुळे हा प्रश्न अधिक गंभीर बनेल. त्यामुळे शासनाने उपराेक्त निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.