धाराशिव : उस्मानाबादचे नामांतर धाराशिव केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल झाली आहे. नामांतराच्या अनुषंगाने दाखल आक्षेपांवर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत महसूल तसेच अन्य विभाग प्रमुखांनी उस्मानाबाद नावात बदल करू नये, असे पत्र २२ एप्रिल राेजी काढले आहे.
उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्यास केंद्र आणि राज्य शासनाकडून मान्यता मिळाल्यानंतर काही कार्यालयांनी तसा बदल केला. दरम्यान, या नामांतराच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल झाली आहे. सध्या प्राप्त झालेल्या आक्षेपांची सुनावणी सुरू आहे. असे असतानाच दुसरीकडे महसूल तसेच इतर विभागांनी जिल्ह्याच्या नावात बदल केल्याची बाब याचिकाकर्त्याच्या विधिज्ञांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत महसूल व इतर विभागांशी संबंधित काेणत्याही कार्यालयांनी बदल करू नये, असे निर्देश दिले आहेत. काेर्टाच्या या आदेशाचा संदर्भ देत जिल्हाधिकारी डाॅ. सचिन ओम्बासे २२ एप्रिल राेजी सर्वच विभागप्रमुखांना पत्र काढले आहे. न्यायालयाच्या आदेशाचे काटेकाेर पालन करावे, असे त्यात म्हटले आहे.