धाराशिव : शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आपापले मार्ग निवडले आहेत. त्यामुळे हे दाेघेही तूर्त एकत्र येतील, असं वाटत नसल्याचं मत राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी मांडलं. माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिलं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हा कार्यालयास रविवारी सदिच्छा भेट दिली असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ईडीच्या कारवाईमुळे भाजपासाेबत गेलात, असा आपणावर आराेप आहे. याबाबत मत काय? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. ‘२०१४ मध्ये भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय झाला हाेता. चर्चाही झाली हाेती. २०१७ आणि २०१९ ला ही निर्णय घेतला. तेव्हा माझ्यावर काेणत्याही स्वरूपाची ईडी कारवाई झालेली नव्हती. ईडीच्या कारवाईत सध्या मला न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यामुळे माझ्यावर हाेत असलेले ‘ते’ आराेप तिळमात्र खरे नाहीत, असे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही, असे वेळाेवेळी म्हटलं जातं. मग आपणाला साहेबांचा आशीर्वाद आहे का, असा प्रश्न केला असता ‘आम्हाला आशीर्वाद आहे की नाही हे मी कसं सांगू शकणार. याबाबत त्यांनाच विचारलेलं बरं’, अशा शब्दात प्रश्न टाेलवला.