जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना प्रथम लसीकरण करण्यात आले. त्यापाठोपाठ १ मार्चपासून ६० वर्षांपुढील नागरिक तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींचे लसीकरण केले जाऊ लागले. १ एप्रिलपासून ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात झाली. एप्रिल महिन्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याने या काळात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तीही मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह येत होत्या. त्यामुळे या वयोगटातील व्यक्तींना लस देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली होती. त्या अनुषंगाने शासनाने १ मे पासून लस देण्याची घोषणा केली. मात्र, जिल्ह्यास मागणीच्या तुलनेत लस मिळत नसल्याने अनेक केंद्रे बंद ठेवावी लागत होती. शिवाय, काही केंद्रांवर रोटेशन पद्धतीने लसीकरण मोहीम राबविली जात आहे. आरोग्याच्या दृष्टीने सजग नागरिक लस घेण्यासाठी केंद्रावर जात आहेत. सोमवारपासून १८ वर्षांपुढील व्यक्तींना लस दिली जात आहे. या वयोगटातील व्यक्तींकरिता ५ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. केंद्रावर प्रतिदिन २०० व्यक्तींना लस दिली जात आहे. त्यासाठी प्रथम नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, काही केंद्रांवर पूर्णता बुकिंग झाले असल्याने नागरिकांचा हिरमोड होत आहे. त्याचबरोबर ४५ वयोगटातील व्यक्तींना लस मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे कुठे लस आहे का लस, अशी चाैकशी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
कोणी काय करायचे
राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोविन ॲपवर नोंदणी करून लसीकरण केले जात आहे.
त्यामुळे १८ वर्षांवरील नागरिकांनी नोंदणी करूनच लसीकरण केंद्रावर जावे. नोंदणी केल्यानंतर लसीकरणाचा दिनांक व ठिकाण निवडणे आवश्यक आहे.
४५ वर्षांपुढील नागरिकांसाठी थेट केंद्रावर जाऊन लस दिली जाणार आहे. मात्र, सध्या लस उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्ह्याला लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कोट...
एक लाख लसीची मागणी केली होती. रविवारी ७ हजार ५०० लस उपलब्ध झाल्या आहेत. सध्या पाच केंद्रांवर १८ वर्षांपुढील व्यक्तींना लस दिली जात असून, शुक्रवारपर्यंतचा स्लॉट बुक झाला आहे. ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर दिनांक, वेळ, ठिकाणचा संदेश प्राप्त झाल्यानंतर या वयोगटातील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर यावे.
डॉ. कुलदीप मिटकरी, लसीकरण अधिकारी,
पॉईंटर...
एकूण लसीकरण १,६२,५४०
फ्रंटलाईन वर्कर पहिला डोस १५३२५
फ्रंटलाईन वर्कर दुसरा डोस ४९३२
४५ वयापेक्षा जास्त वयाचे नागरिक
पहिला डोस १०८२९१
दुसरा डोस १४०४६
कोणाला पहिला मिळाला, तर कोणाला दुसरा
लसीकरण करून घेण्यासाठी दररोज कोविन ॲपवर प्रयत्न करीत आहे. मात्र, ६ मे पर्यंत सर्वच केंद्रांवर लसीचे पूर्णंता बुकिंग झाल्याचे दर्शविण्यात आले. त्यामुळे लसीकरणासाठी इच्छा असूनही नोंदणी झाली नाही.
अजय गायकवाड,
लस घेण्यासाठी सलग चार दिवस लसीकरण केंद्रास भेट दिली. मात्र, दोन दिवस लस संपल्यामुळे परत जावे लागले, तर दोन दिवस केंद्र बंद असल्यामुळे रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. त्यामुळे अद्यापपर्यंत एकही डोस मिळाला नाही.
सुनीता माळाळे