धाराशिव/तामलवाडी : दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी १ लाख रूपये लाचेची मागणी करून ५० हजार रूपये स्वीकारताना तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पाेलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पाेलीस निरीक्षकास (सपाेनि) रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवारी रात्री उशिरा धाराशिवलाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आली. या प्रकरणी तामलवाडी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आराेपी सुरज शांतीलाल देवकर हे तामलवाडी पाेलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पाेलीस निरीक्षक आहेत. तक्रारदार यांच्याविरूद्ध तामलवाडी ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास प्रभारी अधिकारी यांच्या अधिपत्याखालील पोलीस अंमलदाराकडे आहे. संबंधित तपास अधिकारी यांना सांगून तक्रारदार यांना गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी व गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी देवकर याने पंचासमक्ष १ लाख रूपये लाचेची मागणी केली. तडजाेडीअंती ५० हजार रूपये स्वीकारण्याचे ठरले. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी सापळा लावला असता, तक्रारदाराकडून ५० हजार रूपये स्वीकारताना देवकर यास रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवारी रात्री उशिरा झाली.
या प्रकरणी तामलवाडी पाेलीस ठाण्यात देवकर याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सापळा अधिकारी म्हणून पाेलीस निरीक्षक नानासाहेब कदम, सापळा पर्यवेक्षण अधिकारी पाेलीस उपअधिकक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांनी काम पाहिले. सापळा पथकात पाेलीस अंमलदार सिध्देश्वर तावसकर, आशिष पाटील, विशाल डाेके, शशिकांत हजारे यांचा समावेश हाेता.