कोरोनाचा संसर्ग अद्यापही थांबलेला नाही. याला अटकाव घालण्याकरिता शासनाच्या वतीने १६ जानेवारीपासून कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात आरोग्य अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी, महसूल कर्मचारी, पालिका कर्मचाऱ्यांना लस टोचली जात आहे. आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दुसरा डोसही घेतला आहे. लसीकरण मोहीम सुरु झाल्यापासून रक्तपेढ्यांमध्ये रक्तदान करण्यास नागरिक पुढे येणे कमी झाले आहे. तसेच, लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर २८ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे येत्या काळात रक्तटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.
दुसऱ्या डोसनंतर
२८ दिवसांनी करा रक्तदान
अनेकांनी कोरोनाची लस घेतली आहे. तर काहीजण लस घेण्याच्या तयारीत आहेत. परंतु, त्यांना पहिला डोस घेण्यापूर्वी रक्तदान करावे लागणार आहे.
कोरोनाचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांनी घ्यावा लागतो. तर दुसरा डोस घेतल्यानंतर २८ दिवस रक्तदान करता येत नाही. असा एकूण दोन महिन्याचा कालावधी रक्तदान करण्यासाठी लागतो.
ब्लॅड बँक प्रमुख म्हणतात
प्रतिदिन रक्तपेढीतून ४ ते ५ बॅगला मागणी असते. मात्र, मागील दोन महिन्यापासून लसीकरणास प्रारंभ झाला आहे. लसीकरणामुळे रक्तदाते संख्या घटली आहे. उस्मानाबाद शहरात महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथीलाच रक्तदान शिबीरे होतात. शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला. येत्या दोन महिन्यात टंचाई भासू शकते.
डॉ. शशिकांत करंजकर, उस्मानाबाद
गतवर्षी कोरोनामुळे रक्तदान शिबीरे कमी झाली. त्यामुळे रक्तदानाचा तुडवडा निर्माण झाला होता. ऑक्टोबर महिन्यापासून रक्तदान शिबीर होऊ लागली. २६ जानेवारी नंतर पुन्हा शिबीर बंद झाली. लसीकरणामुळे नागरिकांना २ महिने लस घेता येत नाही. त्यामुळे लसीकरणापूर्वी रक्तदान करणे गरजेचे आहे.
डॉ. दामोदर पतंगे, उमरगा
लस घेण्यापूर्वी रक्तदान करण्यांची संख्या कमी
काेरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांनी दिला जातो. तर दुसरा डोस घेतल्यानंतर २८ दिवस रक्तदान करता येत नाही. यात दोन महिने रक्तदात्यांना रक्तदान करण्यासाठी थांबावे लागते. लस घेण्यापूर्वी रक्तदान करणे गरजेचे आहे. मात्र, अनेक नागरिक लस घेण्यापूर्वी रक्तदान करण्याकडे पाठ फिरवित असल्याचे चित्र आहे.