जेवळी : एकीकडे जन्मदरातील असमतोल, तर दुसरीकडे जीवनातील महत्त्वाचे टर्निंग पाॅइंट ठरणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रात मुलांपेक्षा मुलींनी आघाडी घेतली आहे. त्यातच ग्रामीण भागातील मुलांचे झालेले अर्धवट शिक्षण, बेरोजगारी, अल्पशेती आणि कमी वयात वाढलेली व्यसनाधीनता यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी मुलांचे लग्न जमवणे आता कठीण झाले आहे. मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा व शहरात राहणाऱ्याला प्रथम पसंती यामुळे वरपक्ष हैराण झाल्याचे दिसत आहे.
पूर्वीच्या काळात श्रेष्ठ शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, असे म्हटले जात होते. परंतु आता परिस्थिती उलट झाली आहे. पावसाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय सतत अडचणीत सापडत असून, यातूनही चांगले उत्पन्न हाती पडलेच तर त्याला अपेक्षित भाव मिळत नाही. त्यामुळे निव्वळ शेतीवरती अवलंबून असलेल्या अनेक शेतकऱ्याच्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न गंभीर झाला आहे.
फॅशन आणि सेल्फीच्या जमान्यात मुलींच्या अपेक्षेत भरमसाठ वाढ झाली आहे. नव्वद टक्के मुलींचा मानस हा शहरात राहण्याचा आहे. नोकरदारांना पहिली पसंती दिली जात आहे. मुलीच्या संख्येत घट झाल्याने सुंदर मुलींच्या शोधात गलेलठ्ठ पगारवाले मागे लागले आहेत. त्यामुळे अल्पशिक्षण घेतलेल्या मुलींच्या अपेक्षादेखील आपोआप वाढत आहेत. आज ज्याच्या घरी मुली आहेत तो समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती समजले जाऊ लागले आहे.
शहरातील स्थळांना प्राधान्य
संगणक आणि मोबाइलमुळे आज ग्रामीण भागातील मुलीही खूप पुढे गेल्या आहेत. एकत्रित कुटुंब पद्धती असलेल्या ठिकाणी सर्वकाही आलबेल असले तरी मुलीला खूप काम लागेल असे वाटते. त्यामुळे या स्थळांना मुलींचा स्पष्ट नकार आहे. त्यातही ग्रामीण भागात नोकरी असलेल्यांनाही संकट आहे. आज प्रत्येक मुली या शहरात राहण्यासाठी इच्छुक आहेत. विशेषत: अभियांत्रिकी, वैद्यकीय पदवी मिळविलेली बहुतांश मुले शहरात राहत असल्याने या स्थळांनाच मुलींकडून अधिक प्राधान्य दिले जात असल्याचे दिसते.
मुलींपेक्षा आई-वडिलांच्या अधिक अपेक्षा
आपल्यापेक्षा अधिक शिक्षण घेतलेला मुलगा असला पाहिजे, त्यातही शहरात आणि स्वतःचे राहते घर आणि गावाकडे एक घर आणि दहा एकरपेक्षा जास्त शेती. आईवडील असतील तर तेही आपल्या गावात असले पाहिजेत. नोकरी करीत असलेला एक मुलगा आणि लग्न झालेली एखादी बहीण असलेल्या कुटुंबांना मुलींकडून अधिक पसंती दिली जाते. विशेष म्हणजे, लग्नानंतर आपल्या मुलीला कसलाही त्रास होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी मुलींपेक्षाही मुलीच्या आई-वडिलांकडूनच अशा अपेक्षांची यादी वरपक्षासमोर मांडली जात असल्याचेही दिसते.
कोट........
या देशात दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची किंमत हीन आणि केविलवाणी झाली आहे. आज शेतीवर वेगवेगळ्या प्रकारे धोरण अवलंबून सरकार शेतकऱ्यांची थट्टा करीत आहे. अनेक प्रकारच्या मालाला हमीभाव नाही. निव्वळ शेतीवरती कुटुंब चालवणे अवघड झाले आहे. स्वतः कष्ट करणारा शेतकरीसुद्धा मुलीला चांगला पगारदारी नवरा मिळावा ही अपेक्षा ठेवत आहे.
- जगदीश बेडगे, वरपिता जेवळी.
कोट.....
मुलीचं वैवाहिक जीवन चांगले जावे ही प्रत्येक मुलीच्या आई-वडिलांची अपेक्षा असते. त्यासाठी मुलगा नोकरदार, चांगला पगारदार, शहरात राहणारा असावा असे वाटणे साहजिकच आहे. त्यात मुलींनी शिक्षणात बाजी मारली आहे. त्यामुळे मुलींच्या शैक्षणिक पात्रतेनुसार अपेक्षा असणे साहजिक आहे. मुलींच्या तुलनेत मुलांचा शैक्षणिक स्तर कमी पडत चालला आहे. मुलींच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीनुसार पसंती ठरत असते.
संतोष हावळे, वधूपिता
कोट.....
आजच्या परिस्थितीमध्ये लग्न होणे जेवढे महत्त्वाचे आहे, त्याहीपेक्षा झालेले लग्न टिकणे अधिक महत्त्वाचे झाले आहे. वरपित्याकडूनच चांगले स्थळ, हुंडा आणि सोन्याच्या भरमसाठ अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे चांगले स्थळ दाखविण्याच्या लालसेपोटी अनेकजण याकडे व्यवसाय म्हणून पाहत आहेत. यासाठी पालकांनी जागरूक असायला पाहिजे.
- बी.एम. बिरादार, वधूवर सूचक मंडळ चालक
कोट.....
आज मुलीपेक्षा मुलीच्या आईवडिलांची अपेक्षा वाढलेल्या आहेत. वधूवर सूचक म्हणून काम करीत असताना अनपेक्षित प्रसंग समोर दिसत आहेत. दहावी शिक्षण घेतलेली मुलगीसुद्धा नवरा नोकरदार हवा म्हणून हट्ट धरत आहे. सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, मजुरी करणाऱ्या मुलांसाठी मुलगी मिळणे कठीण दिसत आहे. सोनोग्राफी करून मुलगा आहे का मुलगी, याचा जो शोध लागला आणि त्याचा अनेकांनी गैरवापर केला, त्याचे दुष्परिणाम आज दिसत आहेत.
- विनायकराव पाटील, वधूवर सूचक मंडळ चालक
कोट.....
अल्पशिक्षण घेतलेल्या मुलीही नोकरदार किंवा पुणे, मुंबई येथील कंपनीमध्ये चांगल्या पगारावर काम करणाऱ्या वराची अपेक्षा करीत आहेत. हा प्रकार सर्वच जाती-धर्मात आहे. परिस्थिती बदलली असून, आता मुलींच्या वडिलांना हुंडा देऊन लग्न करण्याची वेळ येत आहे. भविष्यात ऐच्छिक आंतरजातीय विवाह मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- सोमनाथ विभुते, वधूवर सूचक मंडळ चालक