लसीच्या दुसऱ्या डोसला उशीर होतोय, घाबरु नका!
उस्मानाबाद : कोरोना लसींच्या पहिल्या डोसनंतर मुदतीत दुसऱ्या डोससाठी नागरिकांची धावाधाव सुरू आहे. मात्र लस उपलब्ध नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. दुसऱ्या डोसला विलंब झाला तरी घाबरून जाण्याचे कारण नाही, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
पहिल्या डोसनंतर २ ते ४ आठवड्यांत मानवी शरीरात प्रतिजैविके तयार होतात. लसीकरणानंतर इतरांपासून संसर्गाची शक्यता कमी होते. पहिल्या आठवड्यानंतर कोरोनाविरोधात लढ्यासाठी काही प्रमाणात प्रतिजैविके तयार होतात. दुसऱ्या डोसनंतर त्यांच्या निर्मितीला गती मिळते. पहिला डोस पूरक असतो, तर दुसरा डोस बूस्टर असतोे; पण दुसरा डोस मिळाला नाही, पहिल्या डोसनंतर कोरेानाची लक्षणे दिसण्याची शक्यता ६० ते ६५ टक्के कमी होते. लस घेतल्यानंतर तीन आठवड्यांनी कोरोना संसर्ग झालाच, तर तुमच्यापासून इतरांना संसर्गाचा धोका ५० टक्क्यांपर्यंत कमी होतो.
लस मिळेपर्यंत थांबा
सध्या लसीचा तुटवडा असला तरी ती आल्यानंतर दुसऱ्या डोसच्या लाभार्थीं ना प्राधान्य देण्यात येणार आहे. तूर्त प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही. सामान्यत: २८ ते ४५ दिवसांदरम्यान दुसरा डोस घ्यावा. असा वैद्यकीय क्षेत्राचा सल्ला आहे.
सध्या अनेक लाभार्थींची दुसऱ्या डोसची मुदत सुरू झाली आहे. मात्र जिल्ह्यास मागणीच्या तुलनेत लसीचा पुरवठा होत नसल्याने अनेक केंद्रे बंद आहेत. काही केंद्रांवर ४५ वर्षांपुढील व्यक्तींना दुसरा डोस दिला जात आहे. लसीचा पुरवठा झाल्यानंतर दुसऱ्या डोसच्या लाभार्थींना प्राधान्य दिले जाणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
कोट ...
उशीर झाला म्हणून घाबरू नका. पहिल्या डोसनंतर २८ ते ४५ दिवसांपर्यंत दुसरा डोस घेणे अपेक्षित आहे; पण उशीर झाला म्हणून घाबरण्याचे कारण नाही. १० ते १५ दिवस विलंबाने लस घेतली तरी चालू शकते. त्याचा काही धोका नाही.
डाॅ. धनंजय पाटील,
जिल्हा शल्य चिकित्सक