डीएड्चा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आधी नोकरीची हमखास हमी होती. आधी दहावीच्या आणि नंतर बारावीच्या निकालानंतर डीएडच्या अभ्यासक्रमाला निवड होण्यासाठी फेरी पद्धत वापरली जायची. त्या फेरीतून निवड झालेल्यांना अध्यापक विद्यालयांत प्रवेश निश्चित केला जात होता. मात्र, मागील काही वर्षात विविध कारणांमुळे डीएडच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी पाठ फिरवत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात १० डीएड कॉलेज असून, यामध्ये ५०० जागा आहेत. मात्र, यंदा केवळ २०० अर्ज आले. एकेकाळी जीवघेणी स्पर्धा असलेल्या या अभ्यासक्रमासंदर्भात सध्या कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे.
डीएडकडे पाठ का?
- सीईटी व टीईटीची वेळखाऊ प्रक्रिया
- शिक्षक भरतीवरील मर्यादा
- खासगी संस्थांच्या शाळांमधील डोनेशन पद्धती
- यापूर्वीची बेरोजगारांची फौज
- नोकरीची हमी नसणे
जिल्ह्यातील एकूण डी.एड. कॉलेज- १०
एकूण जागा -५००
अर्ज प्राप्त- २००
म्हणून इतर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला...
मला डीएडला प्रवेश घेण्याची इच्छा होती. परंतु, डीएड अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीची कोणतीही हमी नाही. अगोदरच डीएड झालेले अनेक उमेदवार बेरोजगार आहेत. त्यामुळे डीएड अभ्यासक्रमाला प्रवेश न घेता विज्ञान क्षेत्राकडे वळलो आहे.
- किरण जगताप, विद्यार्थी, उमरगा
पूर्वी डीएडनंतर शिक्षकाची हमखास नोकरी मिळायची. त्यामुळे या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा याकरिता मोठी स्पर्धा होती. आता तशी परिस्थिती नाही. मी बीएला प्रवेश घेतला आहे.
- अभिजीत चव्हाण, विद्यार्थी, उमरगा
प्राचार्य म्हणतात...
उस्मानाबाद जिल्ह्यात डी.एड. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी संख्या भरपूर आहे. याचा विचार करून शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद तथा डी.एड प्रवेश निवड निर्णय समितीने ऑनलाईन फाॅर्म भरण्याठी मुदतवाढ दिल्यास जिल्ह्याची ५०० ची क्षमता पूर्ण होऊ शकते. डी.एड. अभ्यासक्रमाकडे कमी विद्यार्थी येत असल्याने खासगी कॉलेज अडचणीत सापडले आहेत. प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचे वेतन करणे यासह कॉलेज चालविणे मोठे जिकरीचे ठरत आहे.
-भीमाशंकर सारणे, प्राचार्य, श्रमजीवी अध्यापक विद्यालय (डी.एड.) उमरगा