उस्मानाबाद : कोरोनाबाधितांची संख्या घटू लागली असली, तरी कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे नागरिक सुरक्षेच्या दृष्टीने लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारी ४२ केंद्रांवर लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. ३० केंद्रांवर ४५ वर्षांपुढील नागरिकांना कोविशिल्डचा दुसरा डोस मिळणार आहे, तर १२ केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटास कोव्हॅक्सिनचा पहिला व दुसरा डोस मिळणार आहे.
मागील महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र, कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. शिवाय, येत्या काही महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. कोरोना संसर्गापासून बचाव व्हावा, यासाठी नागरिक स्वत:हून पुढे येऊन लस घेत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून ग्रामीण तसेच शहरी भागांत लसीकरण मोहीम राबविली जात आहे. १२ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. या केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटास कोव्हॅक्सिनचा पहिला व दुसरा डोस घेता येणार आहे; तर ३० केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध असणार आहे. या केंद्रावर ४५ वर्षांपुढील नागरिक, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर यांना कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.
या ठिकाणी मिळेल कोव्हॅक्सिन
मुरूम, लोहारा, सास्तूर, तेर, वाशी, भूम ग्रामीण रुग्णालये; तुळजापूर, उमरगा, कळंब, परंडा उपजिल्हा रुग्णालये; जिल्हा रुग्णालये, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय या केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटांस कोव्हॅक्सिनचा पहिला व दुसरा डोस मिळेल.
यांना घेता येईल कोविशिल्ड
जिल्ह्यातील २७ आरोग्य उपकेंद्रांत मोहीम पार पडणार आहे. उस्मानाबाद शहरातील वैराग रोड व रामनगर भागातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस रुग्णालय या ठिकाणी कोविशिल्डचा दुसरा डोस दिला जाणार आहे. या केंद्रांवर ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस घेता येईल.