उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील साडेसात महिन्यांपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या कालावधीत लसींचा पुरवठा पुरेसा होत नसल्याने लसीकरण मंद गतीने सुरू आहे. दरम्यान, नुकताच मुबलक साठा उपलब्ध झाल्याने १ सप्टेंबर रोजी तब्बल २४ हजार नागरिकांना डोस देण्यात आला आहे. हे आजवरचे विक्रमी लसीकरण असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस देण्यास १६ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. प्रारंभी लस उपलब्ध असतानाही ती घेण्याकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र, दुसरी लाट आल्यानंतर लसीकरणाचे महत्त्व लक्षात आले आणि लसीकरणाला प्रतिसाद मिळू लागला. नजीकच्या काळात लसींचा पुरवठा कमी आणि इच्छुकांची संख्या अधिक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, नुकताच लसीचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाला आहे. त्यामुळे बुधवारी आयोजित लसीकरण सत्रात तब्बल २३ हजार ९१७ जणांना लसीचा डोस देण्यात आला आहे. लसीकरण सुरू झाल्यापासून आतापर्यंतचा हा विक्रमी आकडा असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, सीईओ राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, शल्यचिकित्सक डॉ. डी. के. पाटील, लसीकरण अधिकारी डॉ. के. के. मिटकरी यांनी लसीकरण सत्रांचे नियोजन व्यवस्थित केल्याने आतापर्यंत जिल्ह्यात ६ लाख ३७ हजार २२३ डोस देण्यात आले आहेत. यातील ५ लाख ५९ हजार ४३८ जणांना पहिला डोस मिळाला असून, दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या १ लाख ७७ हजार ७८५ इतकी झाली असल्याची माहितीही आरोग्य विभागाने बुधवारी दिली.