इशारा देताच मुरूम टाकून खड्डे बुजविण्यास सुरुवात
येडशी - रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा, अन्यथा त्याच पाण्याने सरपंच, ग्रामसेवकास अंघाेळ घातली जाईल, असा इशारा टायगर संघटनेच्या वतीने देण्यात आला. ही बाब गांभीर्याने घेत लागलीच रस्त्यावरील खड्डे मुरूम टाकून बुजविण्यास सुरुवात केली.
मागील पंधरा ते वीस वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज चाैक ते भवानी चाैक या मुख्य रस्त्यालगतची नाली तुंबली आहे. त्यामुळे नालीचे पाणी रस्त्यावर येत आहे. पाऊस पडल्यानंतर तर येथून ये-जा करणे कठीण हाेते. याअनुषंगाने सातत्याने पाठपुरावा करूनही ग्रामपंचायतीकडून कुठल्याच उपायाेजना केल्या गेल्या नाहीत. दरम्यान, टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष तुषार शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत नालीच्या पाण्याचा तातडीने बंदाेबस्त करावा, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अन्यथा रस्त्यावरील घाण पाण्याने सरपंच व ग्रामसेवकास अंघाेळ घातली जाईल, असा इशारा दिला होता. संघटनेने दिलेला इशारा गांभीर्याने घेत ग्रामपंचायतीने तातडीने मुरूम टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त केले जाऊ लागले आहे.