- अरुण देशमुख, गोरमाळ, ता़भूम, जि़उस्मानाबाद
उस्मानाबादच्या भूम तालुक्यात मागील ९५ दिवसांत पावसाचा एक थेंबही पडलेला नाही़ तत्पूर्वीही पावसाने दीर्घ खंड दिल्यामुळे खरीप शेतकऱ्यांच्या हातून गेले़ आता रबीचाही विषय उरला नाही़ पिके जागेवरच वाळली आहेत़ भूम तालुक्यात पशुपालनाचा जोडव्यवसाय सर्वाधिक आहे़ त्यामुळे शेतकरी नियमित धान्य पिकांसोबतच चारावर्गीय पिकेही घेतात़ त्यांची वाढ खुंटल्याने पशुधनाची परवड सुरू आहे़
भूम तालुक्यात सर्वात कमी पाऊस वालवड मंडळामध्ये झाला. याच मंडळातील गोरमाळा गाव भूम शहरापासून १५ कि.मी. अंतरावर आहे़ लोकसंख्या ८६६ इतकी आहे. प्रमुख व्यवसाय शेती व पशुपालनाचा़ गावाशेजारी असलेला एक पाझर तलावच या व्यवसायाला बळ देणारा एकमेव जलस्रोत़; मात्र हा तलाव चैत्र महिन्यातच कोरडा पडला, त्यामुळे शेतीसोबतच पशुधनाचीही मोठी आबाळ सुरू आहे़
गावाजवळ अन्य कुठलेच जलस्रोत नसल्याने पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़ गावात पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठल्यामुळे नागरिकांचीही पाण्यासाठी भटकंती सुरू आहे़ दुसरीकडे सोयाबीन, मूग, उडीद यांचे उत्पन्न घटले़ कापूस बोंडअळीने गिळला़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडले नाही़ दुष्काळाच्या झळा आता अतितीव्र होत असतानाही प्रशासनाने ६४ पैसे आणेवारी दाखविली आहे़ त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत़
चाऱ्याची टंचाई जाणवणार अल्प पर्जन्यमानामुळे भूम तालुक्यात यावेळी खरिपाचे मोठे नुकसान झाले आहे़ रबीची पेरणीही १५ टक्के झाली आहे़ शिवाय, रबीत जे पेरले ते उगवेल याचीही शाश्वती आता राहिली नाही़ चारा रबीपासूनच जास्त तयार होतो़ त्यामुळे भविष्यात चाऱ्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे़- गणेश दुरुंदे, तालुका कृषी अधिकारी, भूम
बळीराजा काय म्हणतो?
- यंदा मागील तीन वर्षांपेक्षा दुष्काळ जास्त आहे़ गावाजवळचा पाझर तलाव चैत्र महिन्यातच कोरडा पडला़ पावसाने दगा दिल्याने खरीप गेला़ हातात काहीच नाही़ चारा नाही, पशुधन कसे सांभाळायचे? त्याला बाजारात विकावे तर कोण घेणार? - बाळू औताडे
- माझी सात-आठ एकर शेती आहे़ सर्वकाही शेतीवरच अवलंबून आहे़ कोरडवाहू क्षेत्र असल्याने सगळी मदार पावसावरच अवलंबून; मात्र यावेळी पावसाने पाठ फिरविल्यामुळे आम्ही संकटात सापडलो आहोत़ थोडेफार उत्पादनही हमीभाव कें द्र सुरू नसल्याने कवडीमोल भावात विकावे लागत आहे़ -हारुन शेख
- जून महिन्यात बरसल्यानंतर पाऊस पुन्हा आलाच नाही़ सोयाबीन पावसाअभावी गेल्याने उपटून टाकावे लागले़ शेतीतून काहीच पदरात पडले नाही़ पाण्याचेही सध्या कसेबसे भागतेय़ गावाच्या जवळपास जलस्रोत नाही़ चारा तर दोन महिन्यांखालीच संपला आहे. - बापूसाहेब औताडे
- वालवड सर्क लमध्ये सर्वात कमी पाऊस झाला. यंदा २०१४ पेक्षाही भयानक स्थिती निर्माण झाली आहे़ पशुधन कसे सांभाळायचे, ही चिंता सतावू लागली आहे़ शेतात खरिपाचे काहीच हाती लागले नाही़ रबी पेरणी केली; परंतु त्याला द्यायला आता पाणी नाही़ - युवराज औताडे
- कमी पावसाने शेती संकटात आली आहे़ खरिपातूच हाती काहीच आले नाही़ रबीतील ज्वारीचे बाटूकही मिळणार नाही़ पाण्याचा प्रश्न दिवसागणिक वाढत आहे़ जनावरांना चारा नाही़ सकाळी माळरानात सोडून दिले; पण त्यांना खायला काहीच नाही़ पुढच्या महिन्यात मिळेल त्या किमतीत पशुधन विकावे लागेल़ - भरत गरड