लोकमत न्यूज नेटवर्क
तुळजापूर : सध्या बाजारात सर्वच भाजीपाला कवडीमोल भावाने विक्री होत आहे. अशा परिस्थितीत उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या हातात येत नसल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. महागडा खर्च करूनही पिकवलेला लाल भडक टोमॅटो बाजारात पाठविण्याऐवजी शेतातच सडविण्याची वेळ तालुक्यातील काक्रंबा येथील पदवीधर तरुण शेतकरी सागर वाघमारे यांच्यावर आली आहे.
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील पदवीधर तरुण शेतकरी सागर सोपान वाघमारे यांनी बँकेची नोकरी सोडून शेतीचा मार्ग धरला. त्यांनी गतवर्षीही टोमॅटोची लागवड केली होती. मात्र, कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असल्याने बाजारपेठा बंद होत्या. त्याचा जबर फटका त्यांना सहन करावा लागला. यावर्षी तरी टोमॅटोला चांगला भाव मिळेल, या आशेवर त्यांनी लाखो रुपये खर्च करून एक एकरमध्ये पाच ते सहा हजार टोमॅटो रोपांची लागवड केली. कमी पाण्यावर योग्य पाण्याचे नियोजन करून टोमॅटो पिकाला औषध फवारणी, बांधणी, मांडव व तोडणी असा एकरी लाखभर रुपयांचा खर्च करत बहारदार टोमॅटो पिकवले. मात्र, बाजारपेठेत व्यापाऱ्यांना २२ किलो टोमॅटोचा क्रेट केवळ ५० ते १०० रुपयांना द्यावा लागत असल्याने केलेला खर्चही हातात पडणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे वाघमारे यांनी टोमॅटो तोडून बाजारात विक्रीसाठी न नेता तसाच शेतात ठेवला आहे. कोणत्याही पिकाला चांगला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आणखीनच अडचणीत सापडला आहे. आता शेती करायची तरी कशी आणि पिके घ्यावी तरी का, असा प्रश्न या तरुण शेतकऱ्यापुढे उभा राहिला आहे.
कोट.....
मी एक एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली होती. या पिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत रोपे, खते, औषधे, मांडव, फवारणी, बांधणी असा लाखभर रुपये खर्च केला. यातून जवळपास पाच लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, विक्रीवेळी कवडीमोल बाजारभाव मिळाल्याने चक्क टोमॅटो तोडणीऐवजी रानातच झाडाला सडवला जात आहे. यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने पुढील पिकाची तयारी कशी करावी, हाच प्रश्न सतावत आहे.
- सागर सोपान वाघमारे, शेतकरी