उस्मानाबाद : उसाला ‘एफआरपी’नुसार, कांद्याला हमीभाव तर दुधाला रास्त दर देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूध ओतून व कांदे फेकून आंदोलन करण्यात आले़
राज्य सरकारने ‘एफआरपी’ जाहीर केली असली तरी सध्या ऊसउत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीनुसार दर मिळत नाही. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. कांद्याच्या बाबतीतही काही वेगळी स्थिती नाही. एक ते दोन रूपये किलो या दराने कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दर घसरल्याने दूध उत्पादक पशुपालक शेतकरीही अडचणीत आले आहेत. एकीकडे पशुखाद्याचे दर गगनाला भिडत आहेत अन् दुसरीकडे दूधाचे दर कमी होत आहेत. असे असतानाही शासन या प्रश्नाकडे लक्ष देण्यास राजी नसल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूध ओतून व कांदे फेकून आंदोलन केले.
या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वैशाली गायकवाड, वाहतूक सेना जिल्हा संघटक दत्ता बोंदर, वाशी तालुकाध्यक्ष योगेश उंदरे, परंडा तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, कळंब तालुकाध्यक्ष दत्ता घोंगरे, संतोष बारकुल, अमोल कदम, पवन वरपे, सलीम औटी, नागेश मोरे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या आहेत प्रमुख मागण्या...दूधाला रास्त भाव देण्यात यावा, कांद्याला हमीभाव मिळावा, एफआरपीनुसार शेतकऱ्यांना उसाचे बिल देण्यात यावे, ज्या कारखान्यांनी उसाची बिले दिली नाहीत, त्यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हा नोंदवावा, पाण्याअभावी वाळलेल्या उसाचे पंचनामे करून एकरी दीड लाख रूपये अनुदान द्यावे आदी मागण्यांसाठी मनसेने आंदोलन केले.