ढोकी (धाराशिव ) : धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दु शाळेत मागील एका वर्षापासून रिक्त असलेली शिक्षकाची जागा न भरल्यामुळे तसेच मागील दोन वर्षांपासून शौचालय बंद असल्याने ढोकी ग्रामस्थांनी गुरुवारी शाळेला कुलूप लावून रस्त्यावर शाळा भरविली. सकाळी अकरा वाजल्यापासून हे आंदोलन सुरू असून दुपारी दोन वाजे पर्यंत शिक्षण विभागाचा एकही वरिष्ठ अधिकारी येथे आले नव्हते.
ढोकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दु शाळेत मागील एका वर्षापासून शिक्षकाचे पद रिक्त आहे. यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच जिल्हा परिषद केंद्रीय कन्या प्रशाला व जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा या तीन्ही शाळेत शौचालयाची दुरवस्था, पाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा विविध मागण्यासाठी शैक्षणिक समिती व ग्रामस्थांच्या वतीने गुरुवारी शाळेला कुलूप लावून रस्त्यावर शाळा भरविण्यात आली.