तामलवाडी (जि. उस्मानाबाद) : दसरा सणाचे कपडे धुवून घरावर वाळू घालत असताना विजेचा शॉक लागून बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची घटना तुळजापुर तालुक्यातील खड़की गावात रविवारी घडली.
खडकी येथील सचिन शामराव भडारे (३५) व त्याचा मुलगा जय सचिन भंडारे (११) हे दोघे दसरा सणा निमीत्त धुतलेले कपडे घराच्या छतावर वाळू घालत होते. दरम्यान, त्यांच्या घरावरून विद्युत वाहिन्या गेलेल्या आहेत. धुणे वाळू घालत असताना या विद्युत तारेचा स्पर्श होऊन बाप-लेकास शोक बसला. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सोलापूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सायंकाळी उपचार सुरू असतानाच दोघांचीही प्राणज्योत मालवली.
मयत सचिन भंडारे याना शेतजमीन नाही. तो मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत असे. तर मुलगा जय भंडारे हा इयत्ता ६ वी वर्गात गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत होता. मयत भंडारे यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे. रविवारी रात्री ९ वाजता बाप-लेकाच्या मृतदेहाचे विच्छेदन होऊन रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर खडकी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.