तेरखेडा (जि.उस्मानाबाद) : एका ई कॉमर्स कंपनीचा माल घेऊन औरंगाबादमार्गे दिल्लीकडे निघालेल्या कंटेनरला सोमवारी पहाटे सोलापूर-धुळे महामार्गावर अपघात झाला. यानंतर पहाटेच लोकांनी या कंटेनरमधील माल लुटण्यास सुरुवात केली. पोलीस येईपर्यंत सुमारे ७५ लाखांचा ऐवज येथून पळविण्यात आला. मात्र, पोलिसांनी नंतर ड्रोनद्वारे व प्रत्यक्ष झडती घेऊन चोरीस गेलेला जवळपास ४० लाखांचा माल शोधण्यात यश मिळविले.
एका ई कॉमर्स कंपनीचा डिलिव्हरी करण्यासाठीचा माल घेऊन एक कंटेनर बेंगळुरुहून दिल्लीकडे निघाला होता. यामध्ये जवळपास ७५ लाख रुपयांचा माल होता. सोलापूर-धुळे मार्गावरुन तो औरंगाबाद मार्गे पुढे मार्गस्थ होणार होता. तत्पूर्वीच सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास तेरखेडा (जि.उस्मानाबाद) गावानजिक येताच हा कंटेनर रस्त्याशेजारी उलटला. येथून जवळच असलेल्या पेढीवरील लोकांना या अपघाताची माहिती कळताच तेथील सुमारे दीडशेवर लोकांनी याठिकाणी धावा बोलला. चालकाला धमकावून या लोकांनी कंटेनरमधील माल लुटण्यास सुरुवात केली. ही बाब येरमाळा पोलिसांना कळताच पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास एक पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत कंटेनरमधील बराचसा माल लंपास करण्यात आला होता. दरम्यान, पाठोपाठ उस्मानाबाद येथून पोलीस उपअधीक्षक मोतीचंद राठोड, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन घाडगे यांच्यासह कळंब, शिराढोण, ढोकी, येरमाळा, वाशी येथील ठाण्यांचे पोलीस अधिकारी व कर्मचारीही दाखल झाले. यानंतर या पथकांनी शोध मोहीम राबवून जवळपास ४० लाख रुपयांचा माल शोधून काढला. उर्वरित मालाचाही शोध सुरु असल्याचे उपअधीक्षक मोतीचंद राठोड यांनी सांगितले. याप्रकरणी येरमाळा ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
घरांची घेतली झडतीकंटेनरमधील मालाची लूट झाल्यानंतर जवळच्या वस्तींवर पोलिसांनी धाव घेत आधी लूट केलेला माल परत देण्याचे आवाहन केले. मात्र, कोणीही प्रतिसाद देत नसल्याने पथकांनी प्रत्येक घरांची झडती घेत सुमारे ४० लाखांचा माल शोधून काढला. याशिवाय, ड्रोनच्या मदतीने छत, शेतामध्ये कोठे माल लपवून ठेवला का, याचीही तपासणी केली.
काय होते कंटेनरमध्ये?लूट झालेल्या कंटेनरमध्ये ग्राहकांनी ऑनलाईन मागविलेल्या वस्तूंचा भरणा होता. त्याचे वाटप करीत हा कंटेनर निघाला होता. यामध्ये महागड्या घड्याळी, मोबाईल, क्रीडा साहित्य, कपडे, चष्मे, परफ्युम तसेच इतरही मौल्यवान साहित्य होते.