लोहारा : रोजच्या जीवनातील खाद्य तेलाच्या भावात दिवाळीपासून सातत्याने वाढ हाेत चालली आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट काेलमडताना पहावयास मिळत आहे. काेराेनामुळे अनेकांचे राेजगार गेले आहेत. असे लाेक सध्या आपापल्या गावी परतले आहेत. येथे मिळेल ते काम करून आपली उपजिवीका चालवित आहेत. असे असतानाच दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंसह अन्य साहित्यांचे दर वाढत चाल्याने आर्थिक अडचणींमध्ये भर पडू लागली आहे. एकीडके पेट्राेल तसेच डिझेलच्या दरात दिवसागणिक वाढ हाेत आहे. त्यामुळे वाहतूक खर्चात वाढ हाेत आहे. परिणामी जीवनावश्यक वस्तूंसाेबतच इतर साहित्याचे दर वाढू लागले आहेत.१ डिसेंबरपासून गॅस सिलींडरच्या दरात शंभर ते सव्वाशे रुपयांची वाढ झाली आहे. हीच संधी साधत उपवितरक प्रतिसिलींडर दिडशे ते दोनशे रुपये घेत आहेत. यामुळे ‘आपली चूलच बरी’, म्हणण्याची वेळ ग्रामीण भागातील महिलांवर आली आहे. गॅस सिलींडरसाेबतच खाद्य तेलाचे दरही सातत्याने वाएत आहेत. दिवाळी-दसर्यानंतर तरी दर कमी हाेतील, असे अपेक्षित हाेते. परंतु, तुर्तास तसे हाेताना दिसत नाही.
चाैकट...
दसरा दिवाळीपूर्वी सोयाबीनचे १ लिटर तेल ९५ रुपयांना मिळत होते. ते दिवाळीत ९८ रुपयांला झाले. दिवाळी झाल्यावर भाव कमी होतील अशी, अशा व्यापाऱ्यासह ग्राहकांना होती. परंतु, दिवसागणिक वाढ हाेत चालली आहे. सध्या तेलास प्रतिकिलाे ११५ ते १२० रुपये माेजावे लागत आहे. दिवाळीपूर्वी सूर्यफुलाच्या एक किलाे तेलासाठी ११० रुपये, दिवाळीमध्ये ११५ तर सध्या १३० ते १३५ रूपये लागत आहेत. पामतेलाचा दर ८५ वरून १०५ ते ११० रुपये, शेंगदाणा तेलासाठी आता ११० ऐवजी १३५ रूपये लागत आहेत.
सर्व प्रकारच्या खाद्यतेलांच्या किमती कमी अधिक आहेत. परंतु, जवळपास सर्रास ग्राहकांची पामतेल व सोयाबीन तेलाची मागणी अधिक असते. दिवाळीपासून दररोजच भाववाढ होत असल्याने याचा परिणाम विक्रीवर झाला आहे. आजवर एवढी भाव वाढ कधीच झाली नव्हती.
-शिवा स्वामी, किराणा दुकानदार,लोहारा.
दिवाळीत खाद्यतेलाचे भाव वाढले हाेते. ही वाढ आजही कायमच आहे. याचा फटका सर्वसामानय ग्राहकांना माेठ्या प्रमाणात बसत आहे. काटकसर करून खर्च भागवावा लागत आहे.
-वर्षा चौधरी, गृहिणी, लाेहारा.
सरकारने खाद्य तेल आयात करावे
अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन कमी झाले. परिणामी, विविध खाद्यतेलाचे भाव वाढले. खाद्य तेलाचे भाव वाढल्याचा परिणाम इतर वस्तूंच्या भाववाढीवर होणार आहे. हॉटेल, उपाहारगृहातील विविध खाद्यपदार्थ पदार्थ बनविण्यासाठी तेल वापरण्यात येते. त्यामुळे या सर्वच वस्तूंचे भाव वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने खाद्य तेल आयात केले तरच तेलाच्या भाववाढीला आळा बसू शकतो.
-सचिन सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते, लाेहारा