परंडा : येथील पोलीस ठाणे हद्दीतील २३ गावांमध्ये यंदा ‘एक गाव, एक गणपती’ची स्थापना होणार असून, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सार्वजनिक मंडळांची संख्या कमी झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, पोलिसांनी ९० मंडळांना नियम व अटीच्या दृष्टिकोनातून नोटिसा बजावल्या असून, मिरवणुका व रस्त्यावर उत्सवाला प्रतिबंध केला आहे.
गावामध्ये एकी राहावी यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना पुढे आली. तालुक्यात यंदा संभाव्य २३ गावांमध्ये एक गणपती बसविण्यात येणार असून, एक वॉर्ड - एक गणपती संकल्पनेच्या माध्यमातून परंडा शहरात जय हनुमान टेंभे गणेश मंडळ, शिवछत्रपती गणेश मंडळ, हंसराज गणेश मंडळ, जय भवानी गणेश मंडळ, नरसिंह गणेश मंडळ, समर्थ गणेश मंडळ बाप्पांची प्रतिष्ठापना करणार आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन विविध मंडळांनी अगदी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा. विशेषत: रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, गरजूंना मदत यासारखे उपक्रम राबवावेत. आपले मंडळ किंवा घर गणेशोत्सवातील गर्दीमुळे कोरोनाचे हॉटस्पॉट होऊ नये याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
चौकट....
७० जणांवर प्रतिबंधक कारवाई....
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टिकोनातून मुंबई पोलीस प्रतिबंधक कायदा ५५, ५६, ५७ कलमांन्वये व सीआरपीसी १०७, ११०, १४९ अन्वये परंडा शहर व तालुक्यातील एकूण ७० जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
चौकट....
परंडा पोलीस ठाणे प्रशासनाकडून शहर व ग्रामीण स्तरावर २५ बैठका घेण्यात आल्या आहेत. त्यासोबतच नगरपरिषद व महावितरण प्रशासनासोबत बैठका झाल्या आहेत. या बैठकीत गणेश मंडळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांना रस्त्यावर मंडपाला प्रतिबंध केला आहे. त्यासोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करूनच गणेशोत्सव साजरा करण्यासंबंधीच्या नोटिसा ९० मंडळांना बजावल्या आहेत.
चौकट....
यावर्षी नवीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी दिली जाणार नाही. जुन्या मंडळाने परवानगी घेऊनच गणेशोत्सव साजरा करावा. गणेशाची प्रतिष्ठापना व विसर्जन मिरवणुका काढू नये. बाप्पांची घरगुती मूर्ती दोन फूट व मंडळाची मूर्ती चार फूट उंच असावी. आरती, पूजा करताना गर्दी करू नये. शक्यतो मंडळाने ऑनलाईन दर्शनाची सोय करावी. बाप्पाचा प्रसाद बंद पाकिटातून द्यावा. गणेशमूर्तीच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवावेत व रात्री सुरक्षेसाठी मंडपात कार्यकर्ते ठेवावेत.
- सुनील गिड्डे, पोलीस निरीक्षक, परांडा