येरमाळा (जि.धाराशिव) : सबंध मराठवाड्यात विख्यात असलेले मलकापूर येथील श्री दत्त मंदिर तीर्थक्षेत्राचे प्रमुख एकनाथ लोमटे महाराज यांच्यावर गतवर्षी बीड येथील महिलेच्या तक्रारीनंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात जामिनावर असलेल्या महाराजाविरुद्ध पीडित महिलेने न्यायालयात दाद मागितल्याने येरमाळा पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी पंढरपुरातून अटक केली आहे.
कळंब तालुक्यातील मलकापूर येथील श्री दत्त मंदिर तीर्थक्षेत्र हे मराठवाड्यात विख्यात आहे. श्रद्धाळू भाविकांची येथे नियमित हजारोंच्या संख्येने उपस्थिती असते. तसेच प्रासंगिक कार्यक्रमांच्या वेळी तर ही संख्या लाखोंच्या घरात असते. या तीर्थक्षेत्राचे प्रमुख म्हणून एकनाथ लोमटे महाराज हे काम पाहतात. लोक त्यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन निराकरणासाठी येत असतात. अशीच एक ३६ वर्षीय परळी येथील महिला महाराजांच्या दर्शनासाठी २८ जुलै २०२२ रोजी तीर्थक्षेत्री गेली होती. ती दर्शन मंडपात बसली असताना एकनाथ महाराजांनी या महिलेस खोलीत बोलावून घेतले. शिष्यांना बाहेर जायला सांगून महाराजांनी महिलेसोबत असभ्य वर्तन सुरु केले. या प्रकाराचा प्रतिकार करीत महिलेने आरडाओरड करुन स्वत:ची महाराजांच्या तावडीतून सुटका करुन घेतली.
यानंतर तिने येरमाळा ठाणे गाठून विनयभंगाची तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हाही दाखल केला. दरम्यान, महाराजांनी पोलिसांना गुंगारा दिला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना शोधून अटक केली होती. नंतर या गुन्ह्यात त्यांना जामीनही मिळाला. त्यामुळे पीडित महिलेने न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार येरमाळा पोलिसांनी पुन्हा महाराजांचा शोध सुरु केला असता ते पंढरपुरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मंगळवारी पंढरपुरात दाखल होत पोलिसांच्या पथकाने महाराजांना तेथून अटक केली आहे.