तेर -उस्मानाबाद तालुक्यातील तेर, ढोकी, तडवळे व येडशी या चार गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी तेरणा मध्यम प्रकल्पातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या साहाय्याने पाणीपुरवठा याेजना राबविण्यात आली आहे. कधी धरणात पाणी नसल्याने तर कधी तांत्रिक अडचणींमुळे ही याेजना बंद राहते. मात्र, यावेळी धरणात मुबलक असले तरी सुमारे १ काेटी ९६ लाख रूपये वीजबिल थकित असल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
तेरणा मध्यम प्रकल्पातून चार गाव पाणीपुरवठा योजना २००९ राेजी कार्यान्वित करण्यात आली. सुरूवातीस काही वर्षे ही याेजना सुरळीत चालल्यानंतर संंबंधित चारही गावांतील नळधारकांनी थकित पाणीपट्टी व वीजबिल न भरल्याने २०१५ मध्ये पाणीपुरवठा बंद करण्यात आला हाेता. ही पाणीपुरवठा याेजना पुन्हा सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पाणीपुरवठा पुनर्जीवन याेजनेच्या माध्यमातून सुमारे ३ काेटी ६३ लाख रूपये तरतूद २०१९ मध्ये केली. यानंतर ही याेजना कार्यान्वित झाली. दाेन-अडीच वर्ष सुरळीत पाणीपुरवठा झाल्यानंतर महावितरणची थकबाकी सुमारे १ काेटी ९६ लाखांवर जाऊन ठेपली आहे. ही थकबाकी न भरल्याने महावितरणने १७ जून राेजी वीजपुरवठा खंडित केला आहे. मागील दीड महिन्यापासून या याेजनेद्वारे पाणीपुरवठा बंद आहे. परिणामी ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांना घागरभर पाण्यासाठी रानाेमाळ भटकंती करावी लागत आहे.
चाैकट...
काेट्यवधींची थकबाकी...
चारगाव पाणीपुरवठा याेजनेच्या वीजबिलापाेटी एप्रिल २०२१ अखेर सुमारे १ काेटी ९६ लाख ६४ हजार ६३५ रूपये थकित आहेत. एवढेच नाही तर पाणीपट्टीचे ही सुमारे ९६ लाख ८७ हजार रूपये थकले आहेत. यात तेर गावातील नळ जाेडणी धारकांकडे ३८ लाख ७८ हजार, ढाेकी ३७ लाख ६१ हजार, तडवळा ग्रामस्थांकडे २० लाख ४७ हजार रूपये थकित आहेत.
साेलार प्रकल्पासाठी पुढाकार कधी?
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चारगाव पाणीपुरवठा याेजना काेणत्या कारणामुळे अडचणीत आली, याची माहिती मागितली हाेती. या माहितीच्या आधारे थकित वीजबिलांचे कारण समाेर आले हाेते. त्यामुळे त्यांनी साेलार प्रकल्पास मंजुरी दिली हाेती. या प्रकल्पाचा आराखडाही तयार झाला हाेता. परंतु, अद्याप टेंडर निघाले नाही. त्यामुळे नेतेमंडळी याबाबतीत पुढाकार घेणार तरी कधी? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
स्थायीच्या बैठकीतही चर्चा....
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीतही या पाणीपुरवठा याेजनेंतर्गत चर्चा झाली. ही याेजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करून घेण्याच्या अनुषंगाने अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी मुद्दा मांडला. त्यानुसार सखाेल चर्चा हाेऊन जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसाेबत बैठक घेण्याचे ठरले. त्यामुळे या बैठकीनंतर आता हस्तांतरणाचा विषय मार्गी लागू शकताे.