लोकमत इफेक्ट
भूम : शहरासह तालुक्यात मागील आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे नागरिक बेजार झाले असून, कोरोना सेंटरवरही उपचारात अडचणी येत आहेत. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर याची दखल घेत, केंद्रांवर सुरळीत वीजपुरवठा मिळावा, तसेच तेथील देखभाल-दुरुस्ती तत्काळ व्हावी, यासाठी आता प्रत्येक केंद्रावर वीज कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तहसीलदारांनी याबाबतचे आदेश नुकतेच जारी केले आहेत.
शहरात मागील आठवड्यात रात्री १०च्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला होता. हा बिघाड दुरुस्त करता-करता शहरातील नागरिकांना मध्यरात्र अंधारात काढावी लागली. अशा अडचणी सातत्याने निर्माण होत आहेत, परंतु महावितरण कार्यालयाकडून ही बाब गांभीर्याने घेतली जात नसल्याचे चित्र आहे. सध्या शहरासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांवर प्राथमिक उपचार सुरू आहेत. त्यात भूम येथील ग्रामीण रुग्णालयात दानशूर नागरिक व कोरोना निर्मूलन समिती यांच्या वतीने आजवर १० ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याद्वारे गंभीर रुग्णांना इतरत्र न पाठवता, येथेच उपचार वेळेत व्हावेत, हा यामागील उद्देश आहे, परंतु कोणत्या ना कोणत्या कारणावरून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे रुग्णालय प्रशासनाला या मशीनचा वापर करतानाही अडचणी येत आहेत. त्यामुळे किमान ही बाब तरी गांभीर्याने घेऊन महावितरणने सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
दरम्यान, यासंदर्भात ‘लोकमत’ने १६ मे रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत तहसीलदार उषाकिरण शुंगरे यांनी अधिकाराचा वापर करत महावितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची शहरातील सर्वच कोरोना सेंटरवर नेमणूक केली असून, तसा आदेश देखील काढला आहे.
निधी जातो कुठे?
महावितरण कार्यालयास वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी मागणी प्रमाणे बजेट दिले जाते. यामधे ट्री कटिंग, विद्युत वाहिनीचे झोळ काढणे, विद्युत रोहित्र यामधील तार, किटकॅट यासारख्या खराब झालेल्या वस्तू वेळेत बदलण्यासाठी हा निधी मिळतो. असे असतानाही अडचणी मात्र कायम राहत असल्याने हा निधी नेमका जातो कुठे, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.