उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विद्युतीकरणाच्या कामात गैरप्रकार झाल्याची तक्रार आल्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चाैकशी समिती नेमण्यात आली हाेती. या समितीने अहवाल सादर केला. काही अधिकाऱ्यांवर ठपकाही ठेवला. त्यांच्याविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात आली. आणि नेमकी हीच संचिका जिल्हा परिषदेतून ( Osmanabad Zilla Parishad ) गहाळ (केली?) झाली.
या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी कार्यकारी अभियंता भाेसले यांना गुन्हा नाेंद करण्याचे आदेश दिले हाेते. त्यांनी बळीराम माेरे यांना प्राधिकृत केले असता, पाेलिसांत तक्रार दाखल केली आहे.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विद्युतीकरणाची कामे करण्यात आली. या कामांमध्ये अनियमितता झाल्याचा आराेप झाल्यानंतर सर्वसाधारण सभेत चाैकशीसाठी समिती नेमण्यात आली. त्यानुसार समितीचे प्रमुख तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी चाैकशी करून अहवाल सादर केला.
या अहवालानुसार काही अधिकाऱ्यांवर गैरप्रकाराचा ठपका ठेवण्यात आला हाेता. यानंतर कार्यवाहीसाठी ही संचिका सामान्य प्रशासन विभागात गेली; आणि येथूनच या संचिकेला पाय फुटले. दरम्यान, गहाळ झालेल्या संचिकेच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे तक्रार झाली. यानंतर गुप्ता यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भाेसले यांना पाेलीस कारवाईचे आदेश दिले. भाेसले यांनी यासाठी अधीक्षक बळीराम माेरे यांना प्राधिकृत केले. त्यानुसार त्यांनी आनंदनगर पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल करताना, त्यांनी सामान्य प्रशासन विभागाचे तत्कालीन प्रमुख आणि दाेन कर्मचाऱ्यांनी दिलेले म्हणणेही तक्रारी अर्जासाेबत जाेडले आहे. त्यामुळे पाेलीस चाैकशीतून ही संचिका नेमकी काेणाकडे आहे? हे स्पष्ट हाेऊ शकते.
पोलिसात तक्रार दाखल केली आहे विद्युतीकरणाच्या कामाचा चाैकशी अहवाल आणि कारवाईसाठी प्रस्तावित केलेली संचिका गहाळ झाल्याची तक्रार आली हाेती. त्यानुसार कार्यकारी अभियंता भाेसले यांना आदेशित केले हाेते. त्यांनी प्राधिकृत केलेल्या कर्मचाऱ्याने पाेलिसांत तक्रार दाखल केली आहे.- राहुल गुप्ता, सीईओ, जिल्हा परिषद.