मुरूम (जि. उस्मानाबाद) - केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान याेजना हाती घेण्यात आली. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन टप्प्यात सहा हजार रूपये जमा करण्यात येत आहेत. मात्र, या याेजनेचा अनके धनधांडग्या शेतकऱ्यांनी लाभ घेतल्याचे समाेर आल्यानंतर प्रशासनाकडून पडताळणी करण्यात आली असता, उमरगा तालुक्यातील सुमारे १ हजार ११५ अपात्र लाभाऱ्यांना नाेटिसा धाडण्यात आल्या आहेत. आजवर अडीचशे शेतकऱ्यांकडून तब्बल २० लाखांची वसुली करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान याेजनेअंतर्गत ऑनलाईन नाेंदणी केलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. परंतु, निकषात न बसणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन माहिती भरली. त्यामुळे अशा अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरही पैसे जमा झाले. चाैकशीअंती अनेक आयकर भारणारे तसेच नावे जमीन नसलेले शेतकरी लाभार्थी असल्याचे समाेर आले असता पैसे वसूल करण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार उमरगा तालक्यात तब्बल १ हजार ११५ शेतकरी आपत्र ठरले हाेते. तहसील प्रशासनाकडून या सर्वांनाच नाेटिसा पाठविण्यात आल्या आहेत. आजवर जवळपास अडीचशेवर शेतकऱ्यांनी पैसे शासनखाती जमा केले आहेत. जमा झालेली रक्कम २० लाखाच्या घरात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, सर्व आपात्र शेतकर्यांना नाेटिसा देऊन आठ दिवसांचा कालावधी लाेटला आहे. बहुतांश शेतकरी कामानिमित्त बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे अशा शेतक-र्यांना अद्याप नाेटिसा मिळालेल्या नाहीत. अपात्र ठरलेल्या सर्व शेतक-र्यांकडून तब्बल १ काेटी १४ लाख रूपये वसूल करण्यात येणार आहेत.
काेट...
उमरगा तालुक्यात पीएम किसान योजनेचा लाभ घेतलेले १ हजार ११५ शेतकरी अपात्र ठरले आहेत. यामध्ये आयकर भरत असलेल्या शेतकऱ्यांचाही समावेश आहे. अपात्र ठरलेल्या २५० शेतकऱ्यांकडून अनुदानाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. लाभ घेतलेल्या अपात्र शेतकऱ्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. नोटीस मिळाल्यानंतर ७ दिवसाच्या आत रक्कम भरून रितसर बँकेतून पावती घ्यावी. त्याची छायांकित प्रत देऊन संबंधित तलाठ्याकडून पोहाेच घ्यावी. अन्यथा वसुलीसाठी कायदेशीर कारवाई केली जाईल.
-संजय पवार, तहसीलदार, उमरगा.
काेट...
आलूर तलाठी कार्यालयांतर्गत ५५ शेतकरी पीएम किसान योजनेसाठी अपात्र ठरले असून, त्यापैकी २३ शेतकऱ्यांकडून अनुदानाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. लाभ घेतलेले बहुतांश शेतकरी हे कामानिमित्त बाहेर गावी असल्याने त्यांना नोटिसा अद्यापही मिळालेल्या नाहीत. त्यांच्या मोबाईलवरही माहिती देण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांकडूनही वसुलीसाठी पाठपुरावा सुरू आहे.
-दीपक चव्हाण, तलाठी, आलूर.