कळंब - विकास कामांचा आढावा घेणाऱ्या ग्रामसेवकांच्या शासकीय बैठकीस अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद सदस्य वेळेवर सभागृहात पोहोचल्या; मात्र बराच काळ प्रतीक्षा करूनही चाैदापैकी ११ ग्रामसेवक बैठकीकडे फिरकलेच नाहीत, त्यामुळे काही काळ वाट पाहून सदरील बैठक गुंडाळण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे बैठकीच्या अध्यक्ष तथा जि.प. सदस्य काेरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत गैरहजर मंडळीविरुद्ध कारवाईची मागणी लावून धरली.
तालुक्यातील मंगरूळ जिल्हा परिषद गटामध्ये आढळा, पाथर्डी, आथर्डी, शेळका धानोरा, मंगरूळ, हसेगाव, हावरगाव, भाटसांगवी, सात्रा, खोंदला आदी सोळा गावे येतात. या गावातील विकास कामांना गती देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घ्यावी, अशा सूचना जिल्हा परिषदेने पंचायत समितीला दिल्या होत्या. यासाठी सचिव म्हणून २३ मार्च रोजी आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी यांना नेमण्यात आले होते.
यानंतर मंगरूळ गटातील सर्व १६ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना समन्वयक असलेल्या विस्तार अधिकारी यांनी ३० मार्च रोजी पत्र काढत १ एप्रिल रोजी जिल्हा परिषद सदस्य महानंदा सुरेश कोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगरुळ ग्रा.पं.च्या सभागृहात आयोजित बैठकीस उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात आले होते. यासंबंधीचे पत्र सर्वांना पोहोच करण्यात आले होते.
दरम्यान, या बैठकीची निर्धारित वेळ सकाळी अकराची होती. यासाठी अध्यक्ष तथा जि.प. सदस्य महानंदा कोरे या वेळेवर सभागृहात दाखल झाल्या. यानंतर समन्वयक आरोग्य विस्तार अधिकारी दाखल झाल्या. यावेळी बैठकीस मात्र नीरज मानकरी, पांडुरंग तोडकर व स्थानिक मंगरूळ ग्रांपचे ग्रामसेवक उपस्थित होते.
यानंतर जवळपास तासभर खुद्द बैठकीच्या अध्यक्षांनाच ग्रामसेवकांची प्रतीक्षा करावी लागली. याशिवाय इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांचाही पत्ता नव्हताच. यामुळे अखेर बैठक गुंडाळण्यात आली. महत्त्वाच्या विषयांवरील या बैठकीस खुद्द ग्रामसेवकांची अनुपस्थिती राहिल्याने जि.प. सदस्यांनी गट विकास अधिकाऱ्यांना संपर्क केला. ते पण ‘कनेक्ट’ न झाल्याने शेवटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे झाल्या प्रकाराची कैफियत मांडत जि. प. सदस्यांना सभागृह सोडावे लागले.
चौकट...
११ ग्रामसेवकांची दांडी...
मंगरूळ येथे विकास कामांचा आढावा घेणारी ही बैठक खुद्द पंचायत समितीने आयोजित केली होती. या बैठकीच्या अध्यक्ष सभागृहात ज्यांची बैठक घ्यावयाची आहे, त्या ग्रामसेवक मंडळीची प्रतीक्षा करत बसल्या होत्या; मात्र १४ पैकी चक्क ११ ग्रामसेवक या बैठकीस आलेच नाहीत. यामुळे एका चांगल्या उपक्रमांची खिल्ली उडवली असल्याचे दिसून येत आहे.
काेट...
आपण याविषयी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना बोललो आहाेत. अनेक जण मुख्यालयी वास्तव्यास नाहीत. किमान बैठकांना तरी कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गैरहजर मंडळीवर कारवाई करावी.
-महानंदा सुरेश काेरे, सदस्य, जिल्हा परिषद.