उस्मानाबाद -जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील जिल्हा तसेच तालुकास्तरावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा फेब्रुवारी २०२१ मध्ये संपली आहे. मात्र, अर्धाअधिक मे महिना सरूनही त्यांना सेवासातत्य देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या मानधनाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. परिणामी लाॅकडाऊनच्या काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले आहे. याच मुद्यावरून ग्रामविकास शासकीय कंत्राटी कर्मचारी संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांच्याकडे धाव घेऊन व्यथा मांडली.
जिल्हा परिषदेतील पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडून गावे पाणंदमुक्त व्हावीत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या माध्यमातून घर तेथे स्वच्छतागृह उभारण्यात येत आहेत. यासाठी जिल्हा तसेच तालुका स्तरावर कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. वर्षभराची सेवा संपल्यानंतर त्यांना पुढील वर्षासाठी सेवासातत्य दिले जाते. येथील स्वच्छता मिशन कक्षातील जिल्हा तसेच तालुका स्तरावरील जवळपास सर्वच कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा फेब्रुवारी २०२१ या महिन्यात संपली आहे. त्यांना लागलीच सेवासातत्य देणे गरजेचे हाेते. परंतु, अर्धाअधिक मे महिना सरला असतानाही त्यांना या कार्यालयाकडून सेवासातत्य दिलेले नाही. मात्र, हे कर्मचारी कार्यालयीन कामकाज हाकत आहेत. परिणामी त्यांच्या मानधनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दाेन-दाेन महिने मानधन मिळत नसेल तर त्यांनी आपल्या कुटुंबाचा गाडा कसा हाकावा, असा प्रश्न उपस्थित करीत संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांचे दालन गाठून व्यथा मांडली. कार्यालयीन उपस्थितीचा नियमही पाळला जात नाही. शासनने सुरुवातीला ५० टक्के व नंतर १५ टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्याबाबत आदेश काढला आहे. हा आदेशही कार्यालयाने पाळला नसल्याचा आराेप निवेदनाच्या माध्यमातून केला आहे.
चाैकट...
पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांच्यासमाेर मांडले. त्यांनीही या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करू, अशी ग्वाही दिली आहे.
-रमाकांत गायकवाड, सचिव, कंत्राटी कर्मचारी महासंघ.