अणदूर : तुळजापूर तालुक्यातील गुळहळ्ळी येथील ३१ कुटुंबांचे अतिक्रमण ऑनलाइन करून नियमित करण्यात आले. त्यामुळे अतिक्रमणधारक कुटुंबांना ग्रामपंचायतीकडून मोठा आधार मिळाला आहे.
गुळहळ्ळी येथील गायरान जमिनीवर ही कुटुंबे २०११ पूर्वीपासून अतिक्रमण करून राहत होती. त्यामुळे २०१७ च्या अध्यादेशानुसार शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनार्थ १ जानेवारी २०११ च्या पूर्वीच्या अतिक्रमण स्थळांची पाहणी करून शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. शासन आदेशानुसार गायरान जमिनीवरील अतिक्रमित ३१ घरांचा सर्व्हे करून ऑनलाइन करण्याचे काम ग्रामपंचायतीने पूर्ण केले आहे. यामुळे या ३१ कुटुंबांचे नव्याने ८-अ उतारे तयार होणार आहेत. यासाठी सरपंच मीरा सचिन घोडके, ग्रामसेवक एम. सी. निलगार, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सचिन घोडके यांनी प्रयत्न केले. यावेळी उमेश चव्हाण, संगणक चालक दत्ता निकम, शिपाई वाल्मीक पांढरे, अनिल लांडगे, सिद्राम पांढरे व ग्रामस्थ उपस्थित होते.