धाराशिव : धाराशिव शहरात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय लहुजी पॅँथर संघटनेच्या वतीने १७ मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने सोमवारी संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आदोलन सुरु असतानाच जिल्हा परिषदेसमोर उभ्या असलेल्या एसटी महामंडळाच्या एका बसवर काही व्यक्तींनी दगडफेक केली. यात बसची समोरील काच व पाठीमागील काच फुटली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाला दूध संघाची जागा देण्यात आली आहे. त्याच धरतीवर धाराशिव शहरातील तुळजापूर नाका येथील दूध संघाची जागा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाला देण्यात यावी, शहरात अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा मागणीसाठी लहुजी पँथर संघटनेचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष देवानंद एडके १७ मेपासून उपोषणास बसले आहेत. सोमवारी सहाव्या दिवशी त्यांचे उपोषण सुरूच होते.
प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी सोमवारी आक्रमक होत जिल्हा कचेरीसमोर दुपारी १ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्तारोको आंदोलनामुळे अर्धा तास शहरातील वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी काही व्यक्तींनी धाराशिव आगाराच्या एमएच १४ बीटी २१८७ मुरुड-धाराशिव बसच्या पाठीमागील व समोरील काचावर दगड फिरकावले. बसची पाठीमागील काच फुटली तर समोरील काचेस तडे गेले आहेत. या दगडफेकीत सुदैवाने एकही प्रवासी जखमी झालेला नाही. या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे.