उस्मानाबाद : शासनाने २६ जानेवारीपासून सुरु केलेल्या शिवभोजन योजनेच्या अंमलबजावणीत काही त्रुटी राहिलेल्या दिसून येत आहेत. त्यामुळे सोमवारी काही सरकारी कर्मचारी, पांढरपेशा लोकही १० रुपयांत थाळीचा आस्वाद घेताना दिसून आले. बसस्थानकात तर पहिल्या तासाभरातच मंजूर थाळी संपून गेल्या. उस्मानाबाद शहरातील तीन हॉटेलमध्ये या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. बसस्थानकातील कँटीन, मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील कॅटीन व स्थानकाजवळील फ्रेंड्स हॉटेलला परवानगी देण्यात आली आहे. या दोन्ही कॅटीनला प्रत्येकी ९० तर फ्रेंड्स हॉटेलला ८० थाळ्यांची परवानगी असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, बसस्थानकातील कँटीन हे वर्दळीचे ठिकाण असल्याने याठिकाणी योजनेतून आहार घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. याठिकाणी विद्यार्थी तसेच बरेचसे ग्रामीण भागातून आलेले लोक भोजनाचा आस्वाद घेताना १२.३० वाजता दिसून आले. एकाच वेळी जवळपास ४० व्यक्ती बसून जेवण घेण्याची क्षमता येथे असल्याने पहिल्या तासाभरातच मंजूर थाळ्या संपून जात आहेत. यानंतर प्रशासकीय इमारतीतील कँटीनमध्ये पाहिले असता, याठिकाणी चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छता व अन्नपदार्थांची दर्जा चांगला दिसत होता. मात्र गरीब, गरजूंपेक्षा आर्थिक क्षमता बरी असणाऱ्यांची संख्या जास्त दिसून येत होती. काही सरकारी कर्मचाऱ्यांनाही या भोजनाचा आस्वाद घेतला.
तर १ वाजण्याच्या सुमारास याठिकाणी असलेल्या रजिस्टरमध्ये २७ जणांची नोंद झालेली होती. दरम्यान, सायंकाळी पुरवठा विभागाकडून माहिती घेतली असता, सर्वच मंजूर थाळीचा लाभ सोमवारी तिन्ही हॉटेलमध्ये नागरिकांनी घेतला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या योजनेच्या अंमलबजावणीत काही त्रुटी अजूनही राहिलेल्या दिसून येत आहेत. त्यामुळे सर्वच थाळी खरोखरच्या गरजू असलेल्या लोकांनाच मिळण्याची शक्यता कमी होत चालली आहे. तरीही हॉटेलचालक व आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिकांनीही नैतिकता बाळगल्यास ही योजना गरीबांसाठी चांगली ठरणार आहे.
काय आहे योजनेत त्रुटी
हॉटेलचालक ग्राहक आल्यानंतर त्यांचे नाव, गाव, मोबाईल क्रमांक नोंदवून घेत त्यांचा फोटो अॅपमध्ये अपलोड करतात. मात्र, तो चांगली आर्थिक क्षमता असलेला आहे किंवा नाही, सरकारी अधिकारी, कर्मचारी आहे किंवा नाही, हे त्यास ओळखता येणार नाही. त्यामुळे सर्वच थाळ्या गरजूंनाच गेल्या, हेही स्पष्टपणे सांगता येणार नाही. शिवाय, अॅपमध्ये फोटो अपलोड झाला की, संबंधिताने भोजन घेतले, असे गृहीत धरले जाते. यात गैरप्रकाराला वाव आहे. असे असले तरी हॉटेलचालक व नागरिकांनी नैतिकता पाळल्यास ही योजना गरजूंसाठी चांगलीच असल्याचे आढळून आले.
अशी आहे प्रक्रिया..
- शिवभोजन योजनेचा शहरातील नेमून दिलेल्या तीन हॉटेलमध्येच लाभ घेता येतो. याठिकाणी दुपारी १२ ते २ या वेळेत जाऊन समोरच असलेल्या शिवभोजन काऊंटरवर १0 रुपये भरावे लागतील.
- त्यानंतर हॉटेलचालक या योजनेच्या अॅपमध्ये जावून लाभार्थ्याचा फोटो अपलोड करतो. तेथील रजिस्टरमध्ये लाभार्थ्याने आपले नाव, गाव, मोबाइल क्रमांक भरुन स्वाक्षरी केली की लगेचच त्यांना थाळीचा आस्वाद घेता येणार आहे.
- सुरुवातीला विरोधकांनी गवगवा केल्याप्रमाणे लाभ घेण्यासाठीच्या प्रक्रियेत फारशी अडचण नाही. सोपी, सुटसुटीत ही प्रक्रिया दिसून आली.