माणकेश्वर : भूम तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधील शाळा व्यवस्थापन समित्यांची मुदत जून २०२० मध्येच संपली होती. मात्र, कोरोना संकटात शाळा कधी सुरू होईल हे नक्की नव्हते. त्यामुळे राज्य शासनाने या समितीच्या निवडी न करता शाळा सुरू होईपर्यंत आहे त्याच समितींना मुदतवाढ दिली होती. मात्र, आता समित्यांना दिलेली मुदतवाढ संपवून नवीन शाळा व्यवस्थापन समित्या स्थापन कराव्यात अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.
लहान बालकांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण अधिनियम २००९ नुसार मिळणारे शिक्षण आनंददायी असावे. यातून सर्वगुणसंपन्न पिढी तयार व्हावी, हे प्राथमिक शिक्षणाचे मूलभूत ध्येय आहे. हे साध्य होण्यासाठी पालक-शिक्षक आणि प्रशासनात शाळा व्यवस्थापन समिती महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करीत असते. ज्या शाळा व्यवस्थापन समितीचा कारभार उत्कृष्ट राहतो, त्या शाळेला भौतिक सुविधा लोकसहभाग लाभतो. शिक्षक-पालकांत समन्वय राहत असल्यामुळे त्यामुळे शाळेचा गुणात्मक आलेख उंचावला जातो. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीला विशेष महत्त्व आहे.
दोन वर्षे मुदतीसाठी स्थापन होणाऱ्या समितीत शाळेतील मुलांच्या पालकांची निवड केली जाते. भूम तालुक्यातील बऱ्याच शाळा व्यवस्थापन समित्यांची मुदत जून २०२० रोजी संपली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या समितीला मुदतवाढ देण्यात आली होती. राहिलेल्या शाळांच्या समितीची मुदत ही जून २०२१ मध्ये समाप्त होणार आहे. त्यामुळे व्यवस्थापन समितीच्या नव्याने निवडी करण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य विमल मच्छिंद्र अंधारे, बंडू लहाने, बापू दनाने, सुरेश अडसूळ, शरद उमाप आदींसह पालकांनी केली आहे.
कोट.........
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ऑगस्ट २०२० मध्ये मुदत संपलेल्या शाळा व्यवस्थापन समिती निवडीच्या कार्यक्रमाला राज्य शासनाने सप्टेंबर २०२० मध्ये मुदतवाढ दिली होती. नवीन आदेश अद्याप प्राप्त झाले नाहीत. आदेश येताच त्यावर तत्काळ कार्यवाही करण्यात येईल.
- सुनील गायकवाड, गटशिक्षणाधिकारी, भूम.
शाळेसंबंधी अनेक प्रश्न हे गाव पातळीवरील असतात. ते सोडवण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य नेहमीच अधोरेखित झाले आहे. लोकसहभागातून शाळा मूलभूत, भौतिक सुविधेने संपन्न होण्यासाठी समितीने प्रयत्नशील असावे, अशी पालकांना अपेक्षा असते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बऱ्याच शाळांच्या व्यवस्थापन समिती मदत संपली असूनही नवीन नेमणूका झाल्या नाहीत. त्या लवकर करण्यात याव्यात.
- संजय राऊत, पालक, माणकेश्वर.