उस्मानाबाद - शहरामध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत, या प्रमुख मागणीचे निवेदन ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनकडून करण्यात आली आहे. महिनाभरात स्वच्छतागृहांची उभारणी न झाल्यास तीव्र आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. हे निवेदन मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांना देण्यात आले.
उस्मानाबाद शहराचा विस्तार दिवसागणिक वाढू लागला आहे. अशावेळी नगर परिषदेनेही नागरिकांसाठी आवश्यक साेयीसुविधा पुरविण्यावर भर दिला पाहिजे. परंतु, तसे हाेताना दिसत नाही. शहरामध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारली जावीत, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. परंतु, आजवर याबाबतीत ठाेस निर्णय हाेऊ शकला नाही. परिणामी महिलांना शहरामध्ये वावरताना प्रचंड गैरसाेयीचा सामना करावा लागत आहे. महिलांची हाेणारी कुचंबणा लक्षात घेऊन आता ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने आक्रमक भूमिका घेतली आहे. महिनाभरात शहरातील विविध भागात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे न उभारल्यास अनाेख्या पद्धतीने तीव्र आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. मागणीचे निवेदन मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांना दिले आहे. याप्रसंगी राज्य सहसचिव कॉ. सुजित चंदनशिवे, राज्य कौन्सिल सदस्य धीरज कठारे, कॉ. विश्वदीप खोसे, कॉ. अश्वजित सोनवणे, सूर्याजी देशमुख, गणेश जाधवर, प्रशांत शिंदे, महावीर गायकवाड आदींची उपस्थिती हाेती.