भूम : राज्य रस्ता क्रमांक १५७ ची प्रचंड दुरवस्था झाल्यामुळे शासनाने या रस्त्याच्या कामास मंजुरी दिली. परंतु, त्यापुढे कुठलीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे २५ फेब्रुवारीपर्यंत या रस्त्याचे काम सुरू नाही झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकू, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस गणेश शाळू यांनी दिला आहे.
यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे, या रस्त्यावरून २४ तास वाहतूक सुरू असते. परंतु, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनधारक त्रस्त आहेत. शिवाय, खड्ड्यांमुळे वाहनाची गती कमी होताच आतील साहित्याची चोरी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांकडे विचारणा केली असता खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, प्रत्यक्षात कुठलीच कार्यवाही होत नसल्याचे निवदेनात म्हटले आहे. नादुरुस्त रस्त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या काही बसगाड्यादेखील बंद झाल्यामुळे हे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी काँग्रेसचे सोमनाथ टकले, अमोल टकले, मयूर शाळू, अबेद पठाण व बागायतदार यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते.