प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी पावसाची गरज
ईट (जि.उस्मानाबाद) : भूम तालुक्यातील नांदगाव, वाकवड साठवण तलावांसह बाणगंगा, रामगंगा, तसेच कुंथलगिरी हे प्रकल्प तुडुंब भरले आहेत. मात्र, दुसरीकडे संगमेश्वर सारखा महत्त्वाच्या प्रकल्पात आजही केवळ ५० टक्केच जलसाठा झालेला आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी माेठ्या पावसाची गरज आहे.
पावसाळ्यातील जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लाेटून गेला आहे, असे असतानाही जिल्ह्याच्या सर्व भागांत दमदार पाऊस झालेला नाही. परिणामी, खरीप हंगामातील पिकांनाही पावसाच्या या धरसाेड वृत्तीचा फटका बसला. दरम्यान, मागील पाच-सहा दिवसांत काही भागांत अतिवृष्टी व काही भागांत रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे भूम तालुक्यातील रामगंगा, बाणगंगा, आरसाेली, कुंथलगिरी, वाकवड, नांदगाव हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले. मात्र, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला संगमेश्वर मध्यम प्रकल्प अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. अवघा ५० टक्केच त्यात साठा आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी दमदार पावसाची गरज आहे. यासाेबतच गिरलगाव-घुलेवाडी, बागलवाडी, जांब, हिवर्डा, गाेरमाळा, पाथरूड आणि तिंत्रज हे प्रकल्पांनाही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे, अन्यथा संबंधित प्रकल्पांवर पाण्यासाठी अवलंबून असलेल्या गावांना उन्हाळ्यात पायपीट करावी लागू शकते.