उस्मानाबाद/मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडून मातोश्रीत राहायचा निर्णय घेतला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी भावनिक आवाहन करत मी राजीनामा द्यायला आणि पक्षप्रमुखपदही सोडायला तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर, राज्याच्या राजकारणात सातत्याने घडामोडी घडत आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या गटाला जाऊन मिळणाऱ्या आमदारांची संख्या वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिंदे गटातील मंत्री बच्चू कडू आणि शिवसेना उपनेते तानाजी सावंत यांच्यावरही सोशल मीडियातून चर्चा होत आहे.
सूरत येथून गुवाहाटी येथे रवाना होण्यापूर्वी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी हॉटेलमध्ये काढलेला फोटो समोर आला आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदेंसोबत अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, शंभुराज देसाई आणि बच्चू कडू हे मंत्री तर प्रताप सरनाईक, तानाजी सावंत, सुहास कांदे यांच्यासह शिवसेनेचे इतर आमदारही दिसत आहेत. शिवसेनेनं मंत्रीपद दिलेले अपक्ष आमदार बच्चू कडू या फोटोत दिसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. तर, मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेले आमदार तानाजी सावंत यांची उपस्थितीही लक्षणीय ठरली आहे. दरम्यान, तानाजी सावंत यांनी शिवसंपर्क अभियानातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबद्दलची नाराजी बोलून दाखवली होती. तर, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतची आघाडी शिवसैनिकाला पटत नसल्याचंही ते म्हणाले होते. तेरणा सहकारी साखर कारखान्यासंदर्भात बोलताना त्यांनी हे भाष्य केलं होतं.
मोठ्या अडचणीनंतर तेरणा कारखाना शिवसेनेचे आमदार प्रा. तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शुगरवा भाड्याने देण्याची प्रक्रिया सूरु झाली, तिथेही मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. सहावेळा निविदा प्रसिध्द केल्यानंतर शेवटी कारखाना भैरवनाथ शुगर्सकडे भाड्याने देण्याची प्रक्रिया पुर्ण झाली. त्यावेळी स्पर्धक म्हणुन असलेल्या अमित देशमुख यांच्या ट्वेंटी वन शुगर्सने या प्रक्रियेवर शंका उपस्थित केली, त्याविरुद्ध उच्च न्यायालयात प्रकरण गेले होते. यासंदर्भात तानाजी सावंत यांनी भूम-परंडा-वाशी येथील शिवसेना संपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात बोलताना पक्षावरील आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती.
कारखान्यासंदर्भात महाविकास आघाडीतील मंत्री अमित देशमुख यांच्याकडून आठकाठी घालण्यात आली. यासंदर्भात मी सर्वच नेत्यांच्या कानावर घातलं, मुख्यमंत्र्यांच्याही कानावर घातलं, आदित्य ठाकरेंनाही सांगितलं. पण, काय उपयोग झाला, काहीच नाही, असे म्हणत काँग्रेस-राष्ट्रवादीमधील नेत्यांच्या हस्तक्षेपावरुन नाराजी व्यक्त केली होती. तसेच, शिवसैनिकांनी घरावर तुळशीपत्र ठेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीविरुद्ध लढाई लढली. मात्र, त्यांच्यासोबतच जाण्याची वेळ शिवसैनिकावर आल्याचेही ते म्हणाले होते. 4 जून रोजी त्यांनी या अभियानात भाषण केलं होतं.
दरम्यान, तानाजी सावंत हे व्हायरल फोटोत पहिल्याच लाईनमध्ये दिसून आले. काही दिवसांपूर्वी सोलापूर दौऱ्यावर असताना तानाजी सावंत यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जाहीरपणे टिका करत आपली नाराजी जाहीर केली होती. यावेळी, वरुण देसाई यांना आपले म्हणणे पक्षप्रमुखांच्या कानावर घालण्याचंही त्यांनी सांगितलं होतं. तर, शिवसंपर्क अभियानाच्या 2 ऱ्या टप्प्यात भूम-परंडा-वाशी मतदारसंघातील भाषणावेळीही त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.